समितीसमोर हजर राहण्यास महुआ मोईत्रांचा नकार! दिले 'हे' कारण
27 Oct 2023 18:59:12
मुंबई : तृणमुल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी लोकसभेच्या आचारसंहिता समितीसमोर हजर राहण्यास नकार दिला आहे. समितीने त्यांना ३१ ऑक्टोबर रोजी हजर राहण्याचे आदेश दिले होते. परंतू, त्यांनी काही कारणे पुढे करत हजर राहण्यास नकार दिला आहे.
महुआ मोईत्रांनी संसदेत प्रश्न विचारण्यासाठी हिरानंदानी समुहाकडून लाच घेतली असल्याचा आरोप भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केला होता. संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे आणि महागड्या भेटवस्तू घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
यासंदर्भात भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्षांकडे तक्रारही केली होती. त्यानंतर लोकसभेच्या आचारसंहिता समितीने महुआ मोईत्रा यांना ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी त्यांच्यासमोर हजर राहण्यास सांगितले होते. परंतू, त्यांनी याला नकार दिला आहे. त्यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.
महुआ मोईत्रा म्हणाल्या की, "मी ४ नोव्हेंबरपर्यंत माझ्या लोकसभा मतदारसंघात व्यस्त आहे. त्यामुळे समितीने ठरवलेल्या तारखेला मी उपस्थित राहू शकत नाही. माझे पूर्व-नियोजित मतदारसंघाचे कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर लगेच संसदेच्या आचार समितीसमोर हजर राहण्यास तयार आहे," असे त्या म्हणाल्या.