मुंबई : दसर्याच्या शुभमुहूर्तावर आझाद मैदानात आयोजित शिवसेनेच्या दसर्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेत, शिवरायांपुढे नतमस्तक होत मराठा समाजाला टिकणारं आरक्षण आमचे सरकार देणार म्हणजे देणार, असे आश्वासित केले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “सर्वसामान्य मराठा कुटुंबातील आहे. मला त्यांचे दुःख वेदना कळतात. मलाही त्यांची जाणीव आहे. आपली समिती, जस्टिस शिंदे यांची समिती २४/७ काम करत आहे. कोणावरही अन्याय न करता कोणाचंही काढून न घेता, मराठा समाजाला टिकणारं आरक्षण हे सरकार देणार म्हणजे देणार, या एकनाथ शिंदेच्या शरीरामध्ये रक्ताचा थेंब असेपर्यंत मराठा समाजासाठी लढणार,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केले.
आझाद मैदानावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दसर्या मेळाव्यासाठी यावेळी नागरिकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. आझाद मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “२००४ पासूनच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसायचे होते, पण त्याचा जुगाड लागत नव्हता,” असा खळबळजनक दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केला.
“आपल्याला शिवसेना आणि धनुष्यबाण अधिकृतपणे दिल्यानंतर शिवेसनेच्या खात्यातील ५० कोटी रुपये बँकेकडे मागितले. बँकेने नकार दिला. बँक म्हणाली,निवडणूक आयोगाने शिवसेना एकनाथ शिंदेना दिली आहे. त्यांनी निर्लज्जपणे पत्र पाठवले. तुम्ही आमच्यावर ५० खोक्यांचा आरोप करता आणि ५० खोके आमच्याकडे मागता. या एकनाथ शिंदेंनी क्षणाचाही विलंब न लावता ५० कोटी द्यायला लावले. मी सांगितलं, यांचं प्रेम बाळासाहेब यांच्या विचारांवर नाही. पण खोके आणि ओके मी बोलणार नाही. कारण खोके त्यांना पुरत नाहीत. त्यांना जवळून ओळखणारे म्हणाले की, यांना खोके चालत नाही, यांना कंटेनर पाहिजे. त्याचा साक्षीदार माझ्यापेक्षा दुसरा कोण असू शकतो. योग्य वेळेला बोलेन. आताही टोमणे सभा सुरू असेल. त्यांनी दसरा मेळावा शिमग्याला घ्यायला पाहिजे,” अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर केली.
या’ चेहर्यात अनेकांचे चेहरे!
उद्धव ठाकरेंकडे एक चेहरा आहे पण त्यामागे अनेक चेहरे दडलेले आहेत. त्यामुळं भोळेपणानं जे तिकडे आहेत त्यांनी सावध व्हावं. चेहर्यावर जाऊ नका. अरे पोटातलं पाणीदेखील हालू दिलं नाही त्यांनी. ‘पोटात एक, ओठात एक’ असं आमचं काम नाही. चेहर्यावर दाखवलं नाही, हीच तर खरी कमाल आहे. हे आपल्याला जमत नाही. सीतेचं हरण करण्यासाठी रावणाने साधूचं रुप धारणं केलं होतं. तो साधू म्हणजेच मुख्यमंत्री बनण्यासाठी जे संधीसाधू बनले, ते उद्धव ठाकरे.
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री