जगण्या समाजजीवन, व्हावे सुशोभित स्नातकाने!

25 Oct 2023 22:34:07
Samavartan Sanskar
ज्याप्रमाणे महाविद्यालयात किंवा विद्यापीठात पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी पदवीदान समारंभाचे आयोजन केले जाते. तेव्हा, विद्यार्थ्यांना नवी वेशभूषा (ड्रेस) धारण करविली जाते. त्याच पोशाखातून सर्व पदवीधर आपल्या पदव्या ग्रहण करतात. त्याचप्रमाणे प्राचीन काळचा हादेखील समावर्तन संस्कार म्हणजेच एक प्रकारचा पदवीदान समारंभ होय.

ओम् आपो हि ष्ठा मयोभुवस्ता नऽ ऊर्जे दधातन। महे रणाय चक्षसे॥
(यजुर्वेद -36/14)

अन्वयार्थ

(आप:) हे जलांनो! (हि) निश्चितच तुम्ही सर्वांना (मयोभुव:) सुख देणारे (ष्ठा- स्थ:) आहात.(ता) ते सुख (न:) आम्हां सर्वांना (ऊर्जे) बलाच्या प्राप्तीसाठी (दधातन) द्यावे. जेणेकरून आम्ही (महे) महान व विशाल अशा (रणाय) रणांगणांना, जीवन संग्रामांना (चक्षसे) पाहू शकू!

विवेचन
गुरुकुलामध्ये आचार्यांच्या चरणी मोठ्या श्रद्धेने व तितक्याच तापसवृत्तीने विद्या ग्रहण केलेला ब्रह्मचारी आता पितृगृहाकडे निघाला आहे. आपापल्या शक्तीप्रमाणे क्रमशः 14, 36 किंवा 48 वर्षांपर्यंत व्रतस्थ राहून अखंडितपणे ब्रह्मचर्याचे पालन केलेला अंतेवासी ब्रह्मचारी आपल्या गुरुवर्यांचा निरोप घेतोय. त्याचे पितृगृहाकडे प्रस्थान करणे म्हणजेच आजकालचा पदवीदान समारंभ होय. गुरुवर्यांच्या सान्निध्यातील वनाश्रमीचे तपोनिष्ठ जीवन सोडून झगमगत्या बाह्य दुनियेत पदार्पण करायचे आहे. गुरू व माता-पित्याच्या आज्ञेनुसारगृहस्थाश्रमाचा स्वीकार करून सांसारिक जीवनाचा त्यागपूर्वक उपभोग घ्यावयाचा आहे. त्यासाठी लोकसहवास व भौतिक प्रसाधनांचा उपयोग हवाच त्याचबरोबर गुरुचरणी बसून ग्रहण केलेल्या ज्ञान व विद्येचा सदुपयोग आता त्याला समाज व राष्ट्रासाठी करावयाचा आहे. म्हणूनच आचार्यकुलातून देण्यात येणारी निरोपाची वेळ अतिशय महत्त्वाची ठरते.

भौतिक सुखांचा त्याग करून इतकी वर्षे आचार्यांच्या आश्रमात कठोर परिश्रमाने व अतिशय साधेपणाने जगलेला ब्रह्मचारी आता विद्याविभूषित होऊन पुनश्च पितृकुल व ग्राम/नगर वास्तव्यास निघाला आहे. आजपर्यंत हा नानाविध सौंदर्यप्रसाधने व जगमगत्या दुनियेपासून दूर होता. ज्या आचार्यांनी त्याला बाह्यभूषणांपासून दूर राहून साधेपणाने जगण्याचा आदेश दिला, तेच आचार्य आता त्याला भौतिक दुनियेत वावरण्यासाठी आवश्यक त्या साधनांचा उपयोग करण्याची प्रेरणा देत आहेत. आचार्यांचा अंतेवासी होऊन सर्व नियमांचे व गुरुकुलीय दिनचर्येचे कटाक्षाने पालन केलेला हा ब्रह्मचारी सहजीवनाकडे वळतोय, अशा या शिष्यास आचार्य हे सालंकृत होण्याचा व सजण्याचादेखील आदेश करीत आहेत.समाजजीवन जगण्यास तत्पर झालेला हा विद्यार्थीसुंदर कांतिमान दिसला पाहिजे म्हणूनच यज्ञविधीपूर्वक त्याचे सुशोभीकरण करणे गरजेचे आहे. गुरुकुलवासीयांच्या व गावाकडून आलेल्या आई-वडिलांच्या उपस्थितीत या ब्रह्मचार्‍याकडून त्या सर्व बाबी करवून घेतल्या जाणार, जेणेकरून तो बाह्यांगांनी सुंदर दिसेल.

ज्याप्रमाणे महाविद्यालयात किंवा विद्यापीठात पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी पदवीदान समारंभाचे आयोजन केले जाते. तेव्हा, विद्यार्थ्यांना नवी वेशभूषा (ड्रेस) धारण करविली जाते. त्याच पोशाखातून सर्व पदवीधर आपल्या पदव्या ग्रहण करतात. त्याचप्रमाणे प्राचीन काळचा हादेखील समावर्तन संस्कार म्हणजेच एक प्रकारचा पदवीदान समारंभ होय. ‘समावर्तन’ शब्दाचा विग्रह केल्यास बराच अर्थ स्पष्ट होतो. ‘सम् + आ + वर्तन’ म्हणजेच उत्तमप्रकारे पुनश्च परत आपल्या स्थानाकडे वळणे. जेथून निघालो होतो, पुन्हा तेथे पोहोचणे. म्हणजेच पुनरावृत्ती होणे. आचार्य आपल्या या प्रिय शिष्याला जड अंतःकरणाने त्याची पाठवणी करतात. इतकी वर्षे पिता-पुत्राप्रमाणे एकत्र सोबत राहून या दोघांनाही आता एकमेकांपासून दूर व्हायचेय! किती हा कारुण्यदायक प्रसंग?

समावर्तन संस्कारात विधिपूर्वक ज्या स्थूल व सूक्ष्म क्रिया करून घेतल्या जातात, त्या सर्वांतून शिष्यांना भावी आयुष्यात कसे जगायचे, याचा सम्यक बोध होतो. या संस्कारप्रसंगी यज्ञीय साहित्यासोबतच स्नानासाठी जलाचे आठ कलश (घागरी), उटने, चंदन, पुष्पमाला, धोतर उपरणे इत्यादी नवीन वस्त्रे, चप्पल किंवा बूट पुष्पहार इत्यादी साहित्य आणले जाते. यज्ञाचा बृहद्विधी पूर्ण करून ब्रह्मचार्‍याकडून हवनकुंडातील विखुरलेलाअग्नी एकत्र केला जातो. अग्नीप्रमाणे जीवन जगत समाजात विखुरलेल्या दिव्य शक्तींना एकत्र करण्यासाठी जणूकाही या शिष्याला शुभसंकल्पच करावयाचा आहे. म्हणून अग्नीचा संचय करणे इष्ट त्यानंतर तीन समिधा अग्नीत समर्पित करावयाच्या! आपले जीवनमान समिधारूप बनवत त्याला समाज व राष्ट्राच्या अग्नीत आहुत करणे, हा या मागचा उद्देश.अग्नी हा शरीरांचा धारक व आयुष्य, तेज, बुद्धी या सर्वांना वाढविणारा आहे. म्हणूनच अग्नीसमोर हात हे धरणे व त्यांना तप्त करून त्यांचा मुखाला स्पर्श करणे त्याचबरोबर मुख, प्राण, चक्षु, कान व बाहू यांनाही स्पर्श करीत या सर्व अवयवांना पवित्र करण्याची भावना ग्रहण करणे हे या मागचे मूलभूत प्रयोजन!

या पुढील विधी आहे, तो म्हणजे स्नानाचा! यज्ञवेदीच्या उत्तरभागी ठेवलेले पाण्याचे आठ कलश म्हणजेच घागरी. पहिल्यांदा एका मंत्राने एक घागर व दुसर्‍या मंत्राने दुसरी घागर घेऊन या शिष्याला स्नान करावयाची आहे. त्यानंतर उरलेल्या सहा घागरींतून एका मंत्राने तीन घागरी घ्यायच्या व नंतरच्या एका मंत्राने तीन घागरी घेऊन स्नान करावयाची. आतापर्यंत कसेबसे स्नान केले जायचे. या संस्कारप्रसंगी केल्या जाणार्‍या विशेष स्नानामागचा उद्देश हाच की, यापुढे नेहमी या शिष्याने उत्तम प्रकारे साबण, उटणे, तेल इ. लावून स्नान करावे व शरीर स्वच्छ ठेवावे. पाणी हे प्रतिकात्मक आहे. या स्नानामागचा भाव तसा अत्यंत मौलिक स्वरूपाचा. थंड पाण्याने केलेले स्नान ही शरीराच्या बाह्य मलिनतेला दूर करते. तसेच ते आंतरिक अशुद्धतादेखील नाहीशी करते. विशेषतः ब्रह्मचर्य अवस्थेत कामाग्नी हा फार भयंकर असतो. या कामरूपी अग्नीला थंड करणे व इतरही मानसिक विकारांना दूर करण्यासाठी ही अष्टकुंभांचे स्नान याच स्नानविधीने उच्चविद्याविभूषित तपस्वी विद्यार्थी हा स्नातक बनला आहे. ज्ञान व विद्यारूप जलाने जो पूर्णपणे न्हाऊन निघाला आहे, म्हणजेच ज्याने अशी पवित्र स्नान केले, तोच खरा स्नातक!

वर दर्शविलेल्या प्रारंभिक मंत्रात पाण्याला उद्देशून म्हटले आहे- ’हे जलांनो! तुम्ही मला पवित्र करा. माझ्यातील सर्व प्रकारचे ताप नाहीसे व्हावेत. काम, क्रोध, लोभ, मोह व द्वेष-मत्सरांच्या अग्नी नाहीशा व्हाव्यात. कारण, बाह्य अग्नीपेक्षा या आंतरिक अग्नी फारच भयंकर आहेत. त्यामुळे माणसाचे जीवन उद्ध्वस्त होते. यासाठी या शीतल जलांद्वारे आम्ही आमच्या अंग-प्रत्यंगांना शुद्ध व निर्मळ बनवतो आणि स्नातक बनतो.स्नातक झालेला हा ब्रह्मचारी आता मेखला व दंड या दोन वस्तूंचा त्याग करतोय. या दोन्ही वस्तू स्वसंरक्षणासाठी होत्या. ब्रह्मचर्य पालनासाठी व आरोग्य रक्षणासाठी मेखला, तर आश्रम परिसरातील रानावनात हिंस्र पशूंपासून रक्षण करण्यासाठी दंड (काठी)! पण, आता लोकजीवनाकडे वळत असताना यांची गरज नाही म्हणूनच या दोन्हींचा त्याग करावयाचा.

गुरुकुलात राहत असताना डोक्यावर केस वाढलेले, दाढी व मिशादेखील वाढलेल्या, नखांकडेही लक्ष नव्हते. कसेबसे दात घासले जायचे. पण, आता समावर्तन संस्कार प्रसंगी चांगल्या प्रकारे केशकर्तन करावयाचे. नखेदेखील काढावयाची व दातसुद्धा उत्तम रीतीने घासावयाचे. यानंतर नूतनवस्त्रे धारण करून गळ्यामध्ये पुष्पमाला धारण करावयाची. डोक्यावर टोपी किंवा फेटा बांधावयाचा. विविध प्रकारचे अलंकार धारण करावयाचे. डोळ्यांमध्ये अंजन घालायचे. आरशामध्ये चेहरा न्याहाळून सुंदरतेकडे लक्ष देण्याकरिता सतर्क राहावयाचे. तसेच ऊन व पावसापासून रक्षणासाठी डोक्यावर छत्री धारण करावयाची. त्याबरोबरच पायात उत्तम प्रकारचा बूट किंवा चप्पल घालावयाचा. हे सर्व सौंदर्य-सायास कशासाठी? तर जगातील बाह्य भौतिकतेत वावरण्यासाठी जेणेकरून आपले व्यक्तिमत्व सर्वदृष्ट्या सुंदर प्रगत व आकर्षक बनावे, यासाठीच या सर्व प्रतीकात्मक क्रिया म्हणजे गृहस्थाश्रमात प्रवेश करण्यासाठी घ्यावयाची तयारी हा विधी झाल्यानंतर शेवटी येतो निरोप घेणार्‍या आपल्या प्रिय स्नातक शिष्याला आचार्यांचा अतिशय मौलिक असा उपदेश या संदर्भातील विवेचन पुढील भागात!! (क्रमश:)


प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य


Powered By Sangraha 9.0