डिसेंबरमध्ये सोलापूरच्या पार्क स्टेडियमवर रणजी सामने खेळविणार; ‘एमसीए’ अध्यक्षांची ग्वाही

25 Oct 2023 16:58:42
Ranji matches will be played at the Indira Gandhi Park Stadium

मुंबई
: तब्बल २८ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पहिल्यांदाच सोलापूर शहरातील इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर डिसेंबरमध्ये रणजी सामने होणार आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनला आश्वासन दिले आहे. आता त्यादृष्टीने तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, मुंबई, पुणे, नाशिकनंतर आता सोलापुरात होणारे काही रणजी सामने डिसेंबरमध्ये सोलापूर शहरातील पार्क स्टेडियमवर होणार आहेत.

दरम्यान, सोलापूर येथील इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर सुमारे २२ ते २५ हजार प्रेक्षक बसू शकतात. तसेच, या स्टेडियमवर खेळाडूंसाठी भरपूर ड्रेसिंग रूम आहेत. त्याचप्रमाणे, सरावासाठी खेळपट्ट्या आणि प्रमुख सामन्यांसाठी खेळपट्ट्याही चांगल्या आहेत. काही दिवसांपूर्वी याच मैदानावर रणजी निवड चाचणीचे सामने खेळवण्यात आले होते. त्यामुळे आगामी रणजी सामन्यांसाठी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

दरम्यान, सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या माध्यमातून रणजी सामने पार्क स्टेडियमवर व्हावेत यासाठी पाठपुरावाही सुरू असून ३० वर्षांखालील, १९ वर्षांखालील आणि महिलांचे रणजी सामने होणार आहेत. संघाचे काही रणजी सामने सोलापूरच्या पार्क स्टेडियमवर होणार आहेत.

क्रिकेट सामन्यासाठीही ‘जीएसटी’

स्मार्ट सिटीतून विकसित करण्यात आलेल्या भारतरत्न इंदिरा गांधी पार्क स्टेडियममधील सामन्यांसाठी सध्या जीएसटीसह ८,४०० रुपये भाडे दिले जात आहे. मैदान विकसित होण्यापूर्वी तेथे अवघ्या ५०० रुपयांमध्ये सामने खेळवले जात होते. सोलापूर जिल्ह्यातील क्रिकेटपटूंना राज्यासह देशात जाण्यासाठी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने तयारी सुरू आहे. त्यासाठी जास्तीत जास्त सामने होणे गरजेचे असून, त्यासाठी मैदानासाठी द्यावे लागणारे भाडेही कमी करावे, अशी त्यांची मागणी आहे. मात्र, जास्त भाडे आणि पुन्हा जीएसटीमुळे सामन्यांची संख्या घटल्याने क्रिकेटप्रेमींनी पालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.

Powered By Sangraha 9.0