तेल अवीव : इस्लामिक दहशतवादी संघटना हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात निरपराध ज्यूंना त्यांच्या मुलांसमोर ठार केले. इस्रायलने जारी केलेल्या नवीन फुटेजमध्ये हमासचे दहशतवादी एका ज्यू पित्याला त्याच्या मुलांसमोर ग्रेनेडने उडवताना दिसत आहेत.
वडिलांच्या जखमी शरीरातून रक्ताचे लोट मुलांच्या अंगावर पडतात. हमासच्या दहशतवाद्यांना महिला आणि मुलांचे गळे कापून त्यांना ठार मारण्याचे स्पष्ट आदेश होते. याला हमासच्या एका दहशतवाद्याने दुजोरा दिला आहे. इस्रायलने हमासच्या दहशतवाद्यांच्या बॉडी कॅमेऱ्यांमधून हा व्हिडीओ घेतला आहे. याच व्हिडिओमध्ये हत्या करण्यात आलेले एक लहान मुलगा टेबलाखाली लपल्याचेही दिसत आहे.
पकडलेल्या हमास दहशतवाद्याने सांगितले की, त्याला त्याच्या कमांडर्सनी मृत ज्यू महिलांवर बलात्कार करण्याचे आदेश दिले होते. इस्रायलने दाखवलेले व्हिडिओ आणि फोटो भीतीदायक आहेत. सार्वजनिक करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये हमासचे दहशतवादी एका वाहनावर गोळीबार करत वाहनात बसलेल्या लोकांचा बळी घेत असल्याचे दिसत आहे.
व्हिडिओमधील आणखी एका भागामध्ये हमासचा दहशतवादी फावडे मारून पीडितेचा गळा चिरताना दिसत आहे. हमासचे दहशतवादी अभिमानाने ज्यूंच्या या हत्येचा दावा करतात. एका व्हिडिओमध्ये, एक दहशतवादी त्याच्या आईला फोन करतो आणि अभिमानाने सांगतो की त्याने १० ज्यूंची हत्या केली आहे.
व्हिडिओचा एक भाग एका संगीत महोत्सवाचे फुटेज दाखवतो जेथे हमास इस्लामी दहशतवाद्यांनी २६० लोक मारले होते. हमासचे दहशतवादी लोकांना वाहनांमधून ओढून त्यांची हत्या करतात आणि नंतर आनंदोत्सव साजरा करतात, असे व्हिडिओत दिसत आहे. हमासच्या हल्ल्यात १४०० हून अधिक इस्रायलचा मृत्यू झाला आहे तर २०० हून अधिक लोक अजूनही हमासच्या ताब्यात आहेत. इस्रायलच्या सुरक्षा दलांनी या हल्ल्यांना मानवतेविरुद्धचे गुन्हे म्हटले आहे.