मुंबई : दसरा मेळावानिमित्त उबाठा गटाचे प्रमुख उध्दव ठाकरेंनी शिवाजी पार्क येथे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना संबोधित केले. यावेळी शिवतीर्थावर अर्धवट भरलेल्या मैदानात अर्धवटरावांनी पुन्हा एकदा पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींवर टीका केली आणि घराणेशाही वाचवण्यासाठी एकत्र आलेल्या इंडी आघाडीची वकीली केली, असा घणाघात महाराष्ट्र भाजपने उबाठा गटावर केला,
तसेच, उध्दव ठाकरे यांच्या भाषणावर टीकास्त्र डागतानाच समर्थांचा हवाला देत मूर्खांची लक्षण सांगून खरपूस समाचार घेतला. दरम्यान, भाजपने केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, उद्धव ठाकरे यांनी लक्षात ठेवावं, कोविड काळात महाराष्ट्रात लोकांना उपचार मिळत नव्हते तेव्हा तुम्ही प्रेतांसाठीच्या बॅगामध्येही घोटाळे केले, कोविड सेंटर उभारणीत कुणी लोणी खाल्लं हे लोक विसरले नाहीत. कट कमिशनवर तुम्ही केलेल्या औषध घोटाळ्यांची चौकशी सुरू असल्याचा पुनःउच्चार भाजपने केला.
दरम्यान, तुम्हाला हनुमान चालीसाबद्दल ॲलर्जी आहे म्हणून तर हनुमान चालीसा म्हणाऱ्यांना तुरुंगात डांबलं आणि आता व्यंकटेश स्तोत्र आठवत आहे. आम्हाला आज समर्थांची आठवण झाली, त्यांनी तुमच्यासाठीच लिहून ठेवलं असावं, असे सांगत भाजपने एक दाखला दिला.
आपली आपण करी स्तुती |
स्वदेशीं भोगी विपत्ति |
सांगे वडिलांची कीर्ती |
तो येक मूर्ख ||
असे म्हणत यापुढे तुम्ही मोदीजींवर टीका केल्यास याच शब्दात तुमचा उद्धार केला जाईल. उद्धव ठाकरेंवर टीका करताना भाजप म्हणते की, तुम्हाला आता तुमचे सहकारी सुद्धा कंटाळले आहेत. तो दिवस लवकरच येईल जेव्हा तुम्ही मागे वळून बघाल तेव्हा एकही माणूस शिल्लक राहणार नाही . मी आणि माझे कुटुंब हेच तुमचे विश्व आहे आणि तेच राहील, असा उपरोधिक टोला महाराष्ट्र भाजपने उध्दव ठाकरे यांना लगावला.