नवी मुंबई : पेट्रोल-डिझेलचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने इलेक्ट्रिक वाहने खरेदीकडे अनेकांचा कल वाढला आहे. यात नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात इलेक्ट्रिक वाहनांची अधिक नोंद झाल्यामुळे नवी मुंबईकरांचा कल ई-वाहनांकडे वाढल्याचे दिसून येत आहे.
सुरुवातील इलेक्ट्रिक वाहने खरेदीबाबत ग्राहकांमध्ये निरुत्साह दिसत होता. मात्र सध्या इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या खर्चापासून मुक्ती मिळण्यासाठी आगामी काळात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. तर सध्या दोनचाकी आणि चारचाकी सोबतच मालवाहतूक करणाऱ्या तीनचाकी टेम्पोंनाही मागणी वाढत आहे.
शहरी भागात इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनची उभारणी सुरुवात झाल्यामुळे नागरिक इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी करू लागले आहेत. इलेक्ट्रिक कार महाग असल्या तरी त्या मेन्टेन करणे कमी खर्चिक असते. सध्या इलेक्ट्रिक गाड्या थोड्या महाग आहेत. परंतु ई-कार स्वस्त करण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांवर काही प्रमाणात सूट मिळू शकते.