कॉल सेंटरच्या माध्यमातून अमली पदार्थ विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

24 Oct 2023 19:42:23

drugs

मुंबई :
वाशीतील कॉल सेंटरमधून कोणतीही परवानगी न घेता अमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने या केंद्रावर छापा टाकला असून वियाग्रा सीएलएस, लेविट्रा आणि इतर औषधे विनापरवाना विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. तसेच ही अवैध औषधे विक्री करण्यासाठी सुरू करण्यात आलेले कॉल सेंटर सील करण्यात आले आहे.

आरोपी संकेत महाडिक याने कोणतीही परवानगी न घेता वाशी येथील रिअलटेक पार्क येथे 'फ्रेंड्स सोल्युशन' या नावाने बनावट कॉल सेंटर सुरू केले होते. या कॉल सेंटरमध्ये काम करण्यासाठी त्याने लोकांनाही भरती केले होते. तसेच कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या २२ व्यक्तींनी स्वफायद्यासाठी त्यांची नावे बदलली आणि कॉल सेंटरमधील आयफोनद्वारे यूएसएमधील नागरिकांना VOIP कॉल केले आणि त्यांना वियाग्रा सीएलएस, लेविट्रा आणि इतर औषधे विकली. यासोबतच आरोपी संकेत महाडिक याने परदेशी ग्राहकांचा डेटादेखील विकत घेतला होता.

या औषध विक्रीतून आलेले पैसे इन्व्हॅटिओ इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावाने बँकेत जमा केले. याबाबत आरोपीविरुद्ध फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायदा तसेच भारतीय वायरलेस सॅटेलाइट कायदा ५ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Powered By Sangraha 9.0