बंगरुळू : ग्राहकाकडून पिशवीचे पैसे घेणे बंगरुळूमधील एका कंपनीला चांगलेच महागात पडले आहे. कंपनीने ग्राहक महिलेकडून आपला लोगो असलेल्या पिशवीचे २० रुपये घेतल्याने तिने ग्राहक न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने कंपनीला ३ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
हे प्रकरण बंगरुळूमधील आयकिया कंपनीतील आहे. बंगळुरू येथील संगीता बोहरा यांनी आयकिया स्टोअरमधून खरेदी केली. त्यावेळी आयकिया स्टोअरने एका पिशवीसाठी २० रुपये आकारल्याचे त्यांच्या लक्षात आले. विशेष म्हणजे त्या पिशवीवर आयकिया ब्रँडचा लोगो छापलेला होता.
त्यानंतर पिशवीवर लोगो असताना त्याचे पैसे का घेतले जात आहेत असा प्रश्न त्यांनी कर्मचाऱ्यांना विचारला. यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आणि त्यांच्याकडून पिशवीचे २० रुपये घेतले. ही घटना मागील वर्षी ६ ऑक्टोबर रोजी घडली होती.
त्यानंतर संगीता यांनी १७ ऑक्टोबर रोजी आयकियाला कायदेशीर नोटीस पाठवत ग्राहकांकडून पिशवीचे पैसे घेणे हा चुकीचा प्रकार असल्याचे सांगितले. परंतू, कंपनीने त्यांना त्यांचे पैसे परत करण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांनी ग्राहक कोर्टात धाव घेतली. त्यानंतर आता न्यायालयाने आयकिया कंपनीला महिलेचे २० रुपये परत करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ३००० रुपये दंडही ठोठावला.