मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर यंदाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील खरी शिवसेना आणि शिवसेना उबाठा गट अशा दोन्ही बाजूंकडून दसरा मेळावे होणार आहेत. पक्षातील फूट तसेच कमी झालेली लोकप्रियता यामुळे आपल्या मेळाव्यात गर्दी जमविण्याचे आव्हान उद्धव ठाकरेंसमोर असणार आहे.
एक मैदान, एक वक्ता, एक दिवस आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ठाकरी शैलीतील भाषण, असे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे ज्वलंत विचारांचे स्वरूप अनेक वर्षे शिवतीर्थाने लाखो शिवसैनिकांच्या साक्षीने अनुभवले. परंतु, बाळासाहेबांच्या निधनानंतर दसरा मेळाव्याचा तो बाज राखणे, उद्धव ठाकरेंना जमले नाही. त्यातच शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर दोन मेळावे सुरू झाले आहेत. या दोन्ही मेळाव्यांची सामान्य शिवसैनिकांमध्ये कमालीची उत्सुकता असून कोणाचा मेळावा गाजणार? याकडे अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा मेळावा आझाद मैदान येथे होणार आहे, तर उबाठा गटाचा मेळावा शिवतीर्थावर होणार आहे. या मेळाव्यानिमित्त दोन्ही बाजूंकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. त्यासाठी विभागप्रमुख, संपर्क नेत्यांसह आमदार, खासदारांवर कार्यकर्त्यांना मुंबईत आणण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आमदार, खासदारांसह अन्य आजी-माजी लोकप्रतिनिधी ते अगदी सामान्य शिवसैनिक मोठ्या संख्येने त्यांच्या सोबत येत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदे यांचाच मेळावा रेकॉर्डब्रेक गर्दी खेचून गाजण्याची अटकळ बांधली जाऊ लागली आहे. त्यामुळेच मेळाव्याला येणार्यांसाठी उबाठा गटाच्यावतीने जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गट आणि उबाठा गट या दोघांनीही एकमेकांवर निशाणा साधताना आम्हीच मूळ शिवसेना असून, आमचाच मेळावा दणक्यात होईल, असा दावा केला आहे.
डबेवाल्यांची मेळाव्यांकडे पाठ
मुंबईचे डबेवाले मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी आंतरली सरावली येथे जाणार असल्याने ते या दोन्ही मेळाव्यांना यावेळी उपस्थित राहणार नाहीत.
"आमचीच खरी शिवसेना असून, आम्हीच बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चाललो आहोत."
- नरेश म्हस्के, प्रवक्ता शिवसेना शिंदे गट
"शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा अभूतपूर्व होईल. दुसरे कोण काय करत असेल, तर त्याच्याशी आम्हाला घेणे नाही. ड्यूप्लिकेट माल येतो, काही काळ तो राहतो. त्याचा आवाज किती असतो, सर्वांना माहिती आहे."
- संजय राऊत, प्रवक्ता, उबाठा गट