रसिका शिंदे-पॉल
मुंबई : नवरात्र उत्सव म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर... देशभरात उत्साहात, आनंदात आणि पारंपारिकरित्या नवरात्रौत्सव साजरा केला जातो. भाजप मुंबई आयोजित आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी दांडिया उत्सवात याही वर्षी लाखोंच्या संख्येने गरबा प्रेमींनी मुंबईतील काळाचौकी परिसरातील अभ्युदय नगरच्या मैदानात हजेरी लावली होती. गरबा प्रेमींचा आनंद द्विगुणित करण्यासाठी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी देखील उपस्थिती दाखवली होती. तसेच, गायक-संगीतकार अवधूत गुप्ते यांच्या टीमने सादर केलेली दर्जेदार मराठी गाणी आणि त्यावर ठेका धरणारी सर्व मंडळी हे वातावरणच फार आल्हाददायक होते. “मराठी दांडिया उत्सव हा भाजपचा एक स्तुत्य उपक्रम आहे”, असे अभिनेता आणि मराठी दांडिया उत्सवाचा सुत्रसंचालक पुष्कर श्रोत्री याने ‘महाएमटीबी’शी बोलताना म्हटले.
काय म्हणाला पुष्कर श्रोत्री?
“काळाचौकी, लालबाग, परळ, शिवडी या भागात बऱ्याचदा आलो आहे. इथे माझे अनेक मित्र आहेत. आणि त्यामुळे या परिसरातल्या या काळाचौकीच्या अभ्युदय नगरमधील मैदानात मराठमोळ्या पद्धतीचा भव्य दिव्य आणि देखणा असा दांडिया उत्सव साजरा होईल असा विचार केला नव्हता. याव्यतिरिक्त गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते रोज नव्या गाण्यांची मांदियाळी सगळ्यांसाठी घेऊन येत आहे यासाठी त्याचे विशेष कौतुक आहे. शिवाय गरबा प्रेमींचा उत्साह अधिक वाढवण्यासाठी भाजप रोज दोन उत्कृष्ट वेशभूषेसाठी प्रत्येकी २ आयफोन देत आहेत ही देखील वाखाण्याजोगी बाब नक्कीच आहे”.