सोरायसिस : निदान आणि उपचार

23 Oct 2023 22:23:19
Article on Psoriasis Diagnosis and Treatment

सोरायसिस हा एक त्रासदायक त्वचा रोग आहे. दुर्लक्ष केल्यास किंवा वेळीच औषधोपचार न केल्यास हा आजार शरीरभर पसरतो व त्यातून सांधेदुखी व इतर आजार उद्भवू शकतात. या आजारात त्वचेवर लालसर सुजलेले चट्टे येतात. त्याला प्रचंड खाज येते. खाजविल्याने त्या भागातील त्वचेवर पांढरे, चंदेरी रंगाचे पापुद्रे येऊ लागतात. त्याविषयी आजच्या भागात जाणून घेऊया.

सोरायसिसची कारणे

हा ‘अ‍ॅटोईम्युन आजार’ (रोगप्रतिकारक मध्यस्थ) म्हणून ओळखला जातो. शरीरातील रोगप्रतिकारक लिम्फोसाईट्स पेशी आपल्याच शरीरातील त्वचेच्या पेशींवर हल्ला करतात व त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. आजाराकडे दुर्लक्ष केल्यास हा आजार शरीरभर पसरतो. गुडघा, घोटा, कंबरेभोवती याचे चट्टे दिसू लागतात. त्याला प्रचंड खाज येऊन पापुद्रे निघू लागतात. हा आजार काही प्रमाणात अनुवंशिक आहे. आई-वडिलांना सोरायसिस असल्यास मुलांना हा आजार होण्याची शक्यता वाढते. हा आजार संसर्गजन्य नाही. बाधित व्यक्तीच्या स्पर्शाने हा आजार पसरत नाही. मानसिक ताणतणावदेखील या आजाराचे निमित्त ठरते. सदोष आहार, खाण्यापिण्यातील अनियमितता यामुळेदेखील हा आजार बळावतो. हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. त्यामुळे देखील हा आजार बळावतो. सोरायसिसचे अनेक प्रकार आहेत. त्यातील लालसर चट्टे येऊन होणारा सोरायसिस जास्त प्रमाणात आढळतो. या आजाराचे प्रमाण १० ते ३० वर्षे वयोगटात जास्त आढळते.
 
निदान

वर सांगितलेल्या प्रकारचा लालसर चट्टा व त्यावरील चंदेरी पापुद्रे यावरून बर्‍याच वेळा निदान लगेच होते (स्पॉट डायग्नोसीस). अशाच प्रकारचे चट्टे नायटा, डरमाटायटिस, इक्झिमा, प्रुरीगो नोड्यूलॅरीस इत्यादी आजारात देखील आढळतात. निदानाबद्दल शंका असल्यास त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

चाचण्या

नवीन आजारासाठी चाचण्यांची सहसा गरज लागत नाही. आजार जुना झाल्यास किंवा पसरत असल्यास रक्ताची चाचणी करावी लागते. यात संधिवाताच्या चाचण्यांचा समावेश असतो. क्वचित प्रसंगी स्किन बायोप्सीसुद्धा करावी लागते.
 
आजाराचे मार्गक्रमण

सौम्य प्रमाणात आजार असल्यास फक्त मलम लावूनदेखील हा आजार बरा होतो. चट्टा नाहीसा झाल्यावर त्या भागात नियमित कोल्ड क्रिम लावावी म्हणजे चट्टा पुन्हा उद्भवणार नाही. काही वेळा हा चट्टा आपोआप नाहीसा होऊन थंडीच्या दिवसात पुन्हा उद्भवतो. धुम्रपान, मद्यपान, जागरण, अनियमित जेवणाच्या वेळा, अनावश्यक ताणतणाव यामुळे हा आजार पुन्हा डोके वर काढू शकतो. काही डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हा आजार आटोक्यात आणला जाऊ शकतो. पण, समूळ नष्ट सहसा होत नाही. डोक्यावर, नखांवरदेखील सोरायसिस होऊ शकतो. जुन्या सोरायसिसमध्ये काळसर डाग तयार होतात. यामुळे चेहरा विद्रुप होऊ शकतो.
 
उपचार

सोरायसिसचे निदान होणे महत्त्वाचे आहे. अनेक अनुभवी फॅमिली डॉक्टर याचे स्पॉट डायग्नोसिस करतात. आजाराच्या निदानाबद्दल शंका असल्यास त्वचारोग तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.

त्वचेवरील उपचार

- यात क्रिम, जेल किंवा मलम यांचा वापर करतात. डिपसॅलिक किंवा टॉपिसॉल मलम वापरला जातो. कोल टार मलमदेखील प्रभावी आहे. हे उपचार डॉक्टरांच्या सल्ल्याने करावेत. त्वचेची व्यवस्थित निगा राखावी. स्वच्छ आंघोळ करून सर्व अंगाला कोल्ड क्रिम लावावी. रात्री झोपताना मलम लावावे. सौम्य प्रमाणातील आजार काही वेळा फक्त मलम लावून बरा होतो.

- त्वचेला जास्त खाज येत असल्यास सेट्रिझीनची गोळी डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी.

- आजार जास्त प्रमाणात असल्यास स्टिरॉईडच्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्याव्यात. या गोळ्यांचा कोर्स नियमित पूर्ण करणे.

- बळावलेल्या आजारात अल्ट्राव्हॉयलेट थेरपी (पुवा थेरपी) दिली जाते. ही उपचार पद्धती प्रभावी आहे.

- संधिवाताच्या चाचण्या ‘पॉझिटिव्ह’ असल्यास किंवा संधिवाताची लक्षणे दिसत असल्यास ‘इंडोसिन’ यासारखी औषधे दिली जातात.

- ताणतणाव जास्त असल्यास त्यावरील औषधेदेखील दिली जातात.

- एकंदरीत हा आजार बराच त्रासदायक ठरतो. त्यास कंट्रोलमध्ये ठेवता येते. परंतु समूळ नाहीसे करणे बर्‍याच वेळा शक्य होत नाही.

सोरायसिस आणि आयुर्वेद

सोरायसिस हा जुनाट आजार असल्यामुळे अनेक रुग्ण अ‍ॅलोपॅथी सोडून इतर उपचाराकडे वळताना दिसतात. त्याचा थोडक्यात आढावा घेऊ या.
आर्युवेदात कुठल्याही रोगासाठी त्रिदोषातील संतुलन बिघडणे कारणीभूत ठरते.
 
- वातज आजारात त्वचा कोरडी पडते. पापुद्रे निघू लागतात व त्वचा काळी पडते.
 
- कफज आजारात त्वचेला खाज येते. जखमा चिघळू लागतात, त्वचा शुष्क होते.

उपचार पद्धती

- स्थानिक आजार - यामध्ये आयुर्वेदिक तेलाचा उपयोग केला जातो.

वातज आजारासाठी : करंज तेल, कडूलिंब तेल, यांचा वापर केला जातो, तर कफज आजारासाठी यष्टिमध तेल, दशमूल तेल यांचा वापर केला जातो. अनेक वेळा स्थानिक उपचारांनीच रुग्णाला बरे वाटू लागते.

तोंडावाटे घ्यायचे औषधोपचार : आयुर्वेदामध्येशमन आणि शोधन उपचार पद्धती आहे. शमनमध्ये आजाराची तीव्रता कमी करण्याकडे लक्ष दिले जाते, तर शोधनमध्ये शरीराचे शुद्धीकरण करून आजार समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो.

शमन औषधे
 
वातज प्रकृतीच्या सोरायसिस रुग्णांना त्रिफळा चूर्ण, सूतशेखर रस, यष्टीमध गोळ्या दिल्या जातात. कफज प्रकृतीच्या रुग्णांना आरोग्यवर्धिनी गोळ्या किंवा यष्टिमध गोळ्या दिल्या जातात.

आयुर्वेद आणि पथ्य
 
औषधांइतकेच महत्त्व पथ्यास असते. गरम आणि ताजे अन्न ग्रहण करणे, जेवणाच्या वेळा नियमित ठेवणे. तेलकट, मसालेदार, आबंट पदार्थ टाळणे. विरुद्ध अन्नाचा वापर टाळावाद्द (उदा:- दूध आणि मांसाहार, दूध आणि हिरव्या भाज्या).खारट पदार्थ वर्ज्य करावे.

शोधन उपचार या पद्धतीत शरीर शुद्धीकरणाकडे विशेष लक्ष दिले जाते. वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण या प्रमुख शुद्धीक्रिया आहेत. सोरायसिससाठी रक्तमोक्षण करण्यासाठी जळूचा (लिच) वापर केला जातो. याद्वारे त्वचेतील अशुद्ध रक्त काढून टाकले जाते.
 
वरील सर्व उपाय आयुर्वेद तज्ज्ञांकडून करून घ्यावेत. बोगस डॉक्टरांचा सध्या सुळसुळाट आहे. आजार जुनाट जरी असला तरी असल्या बोगस डॉक्टरांच्या नादी लागू नये.

सोरायसिस आणि होमिअयोपॅथी

अ‍ॅलोपॅथीमध्ये पूर्णपणे बरे न झाल्यास अनेक सोरायसिसचे रुग्ण होमियोपॅथी शाखेकडे वळलेले दिसतात.

आजार बळावलेला असल्यास अरसेनिक अल्बम, ग्राफॅईड, पेट्रोलियम, सल्फर, मेझेरियम यांसारखी औषधे वापरली जातात. ही औषधे तज्ज्ञ होमियोपॅथी डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत. याशिवाय व्यवस्थित हिस्ट्री घेऊन कॉन्टिट्यूशनल ड्रग शोधून काढल्यास हा आजार कायमचा बरा होण्याची शक्यता असते.

वैयक्तिक अनुभव असा आहे की, आम्ही अ‍ॅलोपॅथीचे किंवा मार्डन मेडिसीनचे कितीही गोडवे गायले तरी काही आजारांच्या बाबतीत अ‍ॅलोपॅथी उपचारांना मर्यादा आहे. उदा. सोरायसिस, जुनाट चर्मरोग, दमा, संधिवात इत्यादी रोगांमध्ये रुग्ण डॉक्टरकडे जाऊन हैराण झालेला असतो. अशा वेळेस तो आयुर्वेद किंवा होमियोपॅथी शाखेकडे वळतो आणि अहो आश्चर्यम आजार संपूर्णपणे बरा झालेला असतो. ४० वर्षांच्या माझ्या वैद्यकीय व्यवसायात गेली २० वर्षे मी आयुर्वेदआणि होमियोपॅथीचा अभ्यास केला आणि वरील आजारांमध्ये या औषधांचा उपयोगदेखील केला. सोरायसिसमध्येदेखील अ‍ॅलोपॅथीबरोबर आयुर्वेदिक आणि होमियोपॅथी औषध फायदेशीर ठरते, असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. इंटीग्रेटेड वैद्यकीय शिक्षण ही बदलत्या काळाची गरज आहे. त्याची अंमलबजावणी लवकर व्हावी.

प्रतिबंधात्मक उपाय

सोरायसिस वाढण्यास ताणतणाव हे मुख्य कारण आहे. मानसिक अस्वास्थ्य त्यास कारणीभूत ठरते. मानसिक स्वास्थ्य मिळविण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात अध्यात्माची जोड आवश्यक आहे. आपली दिनचर्या नियमित करणे, मद्यपान व धुम्रपान टाळणे, व्यवस्थित झोप घेणे, नियमित व्यायाम करणे, योगा, विपश्यना, ध्यान धारणा, ब्रह्मविद्या, उपासना, सुदर्शन क्रिया यातील एकातरी पद्धतीचा आपल्या दैनंदिन जीवनात समावेश करावा. आयुष्य तणावमुक्त करावे म्हणजे सोरायसिसमुळे दिवसभर खाजवत राहण्याची वेळ येणार नाही.
डॉ. मिलिंद शेजवळ
९८९२९३२८०३
Powered By Sangraha 9.0