डोंबिवली : नवरात्र उत्सवात स्त्री शक्तीचा जागर केला जातो. पण आपल्या समाजाचा एक घटक असलेल्या किन्नरांना मात्र नेहमीच दुजाभावाने वागवले जाते. आपल्या समाजातील एक महत्त्वाचा घटक असलेल्या किन्नरांना मानाचे स्थान देत डोंबिवलीतील दत्तनगर मित्र मंडळ व माऊली मित्र मंडळाने नवरात्री उत्सवात किन्नर समाजाला देवीच्या आरतीचा मान देत एक नवीन पाऊल उचलले आहे. या मंडळाने दिलेला सामाजिक संदेश शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.
डोंबिवली पूव्रेतील दत्तनगर मित्र मंडळ आणि माऊली मित्र मंडळ यांच्या वतीने गेल्या कित्येक वर्षापासून नवरात्री उत्सव साजरा केला जात आहे. या उत्सवादरम्यान महाराष्ट्रातील कीर्तनकारांना आमंत्रित करून त्यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. नवरात्र उत्सव मंडळाकडून नवरात्रीत नेहमीच गरब्याचे आयोजन केले जाते. पण या मंडळांकडून कीर्तनाचे आयोजन करण्यात येत असल्याने ते इतरांपेक्षा वेगळे ठरले आहे. स्वत:चा वेगळा ठसा उमटविलेल्या या मंडळांने अजून एक पाऊल पुढे टाकत देवीच्या आरतीचा मान किन्नरांना दिला आहे. या मंडळांनी घालून दिलेल्या आदर्श इतर मंडळ देखील अंगीकारल्यास किन्नर समाजाला ही समाजात मानाचे स्थान मिळेल. कल्याण पूव्रेतील आठ-नऊ कि न्नरांनी हजेरी लावली होती.
यावेळी स्थानिक माजी नगरसेवक राजेश मोरे यांनी सांगितले, किन्नर समाजाच्या ज्या काही मागण्या असतील, त्यांच्या काही समस्या असतील त्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न करू.
किन्नर सायली म्हात्रे यांनी स्थानिक माजी नगरसेवक आणि या मंडळाने आम्हाला जो मान दिला त्याबाबत आनंद व्यक्त केला. तसेच त्यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी देवीकडे साक डे घातल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय आमच्या समस्याकडे ही त्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी केली.