गवताळ कुरणांवरील महाराष्ट्रातील पहिली ग्रासलँड सफारी पुण्यात

    21-Oct-2023
Total Views |



grassland safari


मुंबई (विशेष प्रतिनिधी): पुण्यातील बारामती व इंदापुर तालुक्यात महाराष्ट्रातील पहिली ग्रासलँड सफारी करण्यात आली आहे. पुणे वनविभागाच्या पुढाकाराने मंगळवार दि. १७ ऑक्टोबर रोजी गवताळ कुरणांवरील सफारीसाठीच्या वेबसाईटचे उद्घाटन केले गेले आहे.


गवताळ कुरणांवरील परिसंस्थेत आढळणाऱ्या कोल्हा, चिंकारा, लांडगा, तरस, ससे, खोकड अशा प्राण्यांच्या अधिवासाला धोका निर्माण झाला होता. गवताळ कुरणांवर आढळणाऱ्या या जैवविविधतेच्या वन्यजीव छायाचित्रणासाठी अनेकजणांची संख्या वाढत असल्यामुळे या प्राण्यांना धोका निर्माण झाल्याचे चित्र होते. गवताळ कुरण परिसंस्थेचे आणि या जैवविविधतेचे रक्षण व्हावे या महत्त्वाकांक्षेतुन या प्रकल्पाविषयीचा पहिला प्रस्ताव पुण्यातील ‘द ग्रासलँड्स ट्रस्ट’ या संस्थेकडून पुणे वनविभागाला देण्यात आला होता. या प्रस्तावानुसार पुढील कार्यवाही करत पुणे वनविभागाने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक मयूर बोठे, आशुतोष शेंडगे यांच्या समन्वयातुन हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.


बारामती, दौंड, इंदापूर, सासवड या भागात असलेल्या वनक्षेत्रातील गवताळ कुरणांवर वेशिष्ट्यपुर्ण जैवविविधता आढळुन येते. स्थानिक ग्रामस्थ, संस्था, वन्यजीव प्रेमी यांच्याकडून मिळालेल्या सातत्यपुर्ण सहाय्यातुन इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी आणि बारामती तालुक्यातील शिर्सुफळ या दोन ठिकाणी ही ग्रासलँड सफारी सुरू करण्यात आली आहे. वन्यजीव छायाचित्रकारांना चिंकारा, कोल्हा, लांडगा, तरस, ससे अशा प्राण्यांची छायाचित्रणे काढता येणार आहेत. त्याचबरोबर, इतर सस्तन प्राणी, पक्षी आणि जैवविविधतेतील घटकांचे निरिक्षण करण्याची संधी मिळणार आहे. तसेच, या सफारीमुळे स्थानिक ग्रामस्थांना रोजगाराच्या संधी ही उपलब्ध होणार आहे. या सफारीसाठी www.grasslandsafari.org या संकेतस्थळावर बुकिंग करता येणार आहे.


“पुण्यातील सुरू झालेली ही गवताळ कुरणांवरील सफारी या परिसंस्थेच्या संवर्धनाच्या दृष्टीने उचलेलं अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. यामुळे परिसंस्थेतील घटकांच्या संवर्धनाबरोबरच स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतोय हे महत्त्वाचं आहे. महत्त्वांचं म्हणजे यामुळे नियंत्रित पर्यटन व्हायला महत होणार आहे.”

- मिहीर गोडबोले
संचालक, द ग्रासलँड्स ट्रस्ट