तरुणाई म्हणजे जोश, उत्साह, कल्ला, देदीप्यमान बुद्धिमत्ता आणि बरंच काही. आजच्या तरूण पिढीचे प्रतिनिधित्व करणारे अनेक मराठी, हिंदी आणि विविध भाषिक चित्रपट आजवर प्रदर्शित झाले. मराठी चित्रपटसृष्टीतदेखील तरुणाईच्या जीवनातील विविध टप्पे सांगणारे चित्रपट आलेच. मात्र, विशाल देवरूखकर दिग्दर्शित ’बॉईज’ या चित्रपटाने एक वेगळाच इतिहास रचला. या चित्रपटाचे एक-दोन नाही, तर चक्क चार भाग प्रदर्शित झाले आणि प्रत्येक भाग हा बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. दि. २० ऑक्टोबर रोजी ’बॉईज ४’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. जाणून घेऊयात या चित्रपटाबद्दल...तरुणाई म्हणजे जोश, उत्साह, कल्ला, देदीप्यमान बुद्धिमत्ता आणि बरंच काही. आजच्या तरूण पिढीचे प्रतिनिधित्व करणारे अनेक मराठी, हिंदी आणि विविध भाषिक चित्रपट आजवर प्रदर्शित झाले. मराठी चित्रपटसृष्टीतदेखील तरुणाईच्या जीवनातील विविध टप्पे सांगणारे चित्रपट आलेच. मात्र, विशाल देवरूखकर दिग्दर्शित ’बॉईज’ या चित्रपटाने एक वेगळाच इतिहास रचला. या चित्रपटाचे एक-दोन नाही, तर चक्क चार भाग प्रदर्शित झाले आणि प्रत्येक भाग हा बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. दि. २० ऑक्टोबर रोजी ’बॉईज ४’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. जाणून घेऊयात या चित्रपटाबद्दल...
’बॉईज’ चित्रपटाचा पहिला भाग, हा २०१७ रोजी प्रदर्शित झाला होता आणि तेव्हापासूनच चित्रपटातील ढुंग्या, धैर्या आणि कबीर यांच्यातील निखळ आणि घट्ट मैत्री चित्रपटाच्या इतर भागांप्रमाणे प्रवास करत पुढे गेली. शाळा ते महाविद्यालयाचा प्रवास, हा चित्रपटाच्या श्रृंखलेतून दाखवण्यात आला. महाराष्ट्रातील एका खेड्यातील शाळेपासून सुरू झालेला ढुंग्या आणि धैर्याचा प्रवास त्यांना ’बॉईज ४’ चित्रपटात थेट लंडनला घेऊन जातो. गेल्या काही वर्षांत बरीच तरूण मंडळी परदेशात शिकण्यासाठी गेली आणि कालांतराने तेथेच नोकरी करत स्थायिकदेखील झाले. परंतु, परदेशात असे अनेक भारतीय आहेत, जे त्या देशात राहूनही आपल्या देशाचा मान आणि आपली संस्कृती ही जपून ठेवतात. ’बॉईज ४’ या चित्रपटाचे कथानकदेखील भारतीय संस्कृतीची देवाणघेवाण या विषयावरच आधारित आहे. अगदी थोडक्यात सांगायचे झाल्यास, चित्रपटातील तीन प्रमुख पात्रं ढुंग्या, धैर्या आणि कबीर शिक्षणानिमित्ताने आणि भारतीय संस्कृतीचे आदानप्रदान करण्यासाठी लंडनला जातात आणि तिथे आपली संस्कृती तेथील विद्यार्थ्यांना समजावून सांगतात. मात्र, या सगळ्यात त्यांच्यातील मैत्रीचे धागे काहीसे सैल होतात. पण, हीच भारतीय तत्त्व, मूल्ये त्यांना पुन्हा जवळ आणतात.
दिग्दर्शक विशाल देवरूखकर यांनी ’बॉईज ४’मधून तरुणाईचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन, आपल्या संस्कृतीला जाणून घेण्याची क्षमता, शिक्षणाचे महत्त्व अशा विविध गोष्टींवर कळत आणि प्रसंगी नकळतपणे भाष्य केले आहे. एकीकडे अभिनेता गौरव मोरे याने साकारलेले पात्र केवळ मजामस्ती करण्यासाठीच लंडनची वाट धरतो, तर दुसरीकडे अभिनेता पार्थ भालेराव आणि प्रतीक लाड आपला मित्र सुमंत शिंदे अर्थात कबीर याला मैत्री, संस्कृती, शिक्षण या सगळ्यांची जाणीव करून देण्यासाठी आणि आपल्या भावना व्यक्त होण्यासाठी कोणत्याही भाषेचे बंधन नसते, हे पटवून देण्यासाठी लंडनला जातात. दिग्दर्शकांनी भारतातील नागरिक जे तात्पुरते आणि कायमस्वरुपी परदेशात येथे केवळ लंडनमध्ये स्थायिक झाले आहेत, त्या भारतीयांची मानसिकता फार उत्तमरित्या अधोरेखित करतात. १५० वर्षं ज्या ब्रिटिशांनी भारतावर किंबहुना जगावर राज्य केलं, त्यांच्याच देशात स्थायिक झालेल्या भारतीयांना आपल्या देशाचा अभिमान आणि आपली सांस्कृतिक श्रीमंती त्यांना दाखवून देण्याची वेळही येतेच आणि ती दाखवून दिली पाहिजे, हेदेखील यातून सांगण्याचा आणि पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
चित्रपटातील एका प्रसंगात लंडनमध्ये सर्व भारतीय विद्यार्थी एका पाकिस्तानी हॉटेलमध्ये जेवण्यासाठी जातात, असे दाखवले आहे, त्यावेळी प्रमुख पात्र तेथे जेवण्यास नकार देतात. पण, त्यांची शिक्षिका त्यांना समजावून सांगते की, दोन देशांतील राजकीय भांडणात शक्यतो आजच्या तरूण पिढीने पडू नये. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, केवळ परेशात गेल्यावरच आपण भारतीय असतो आणि देशाचा गौरव मिरवतो. परंतु, भारतात असताना आपण भारतीय नसतो तर कोणत्या ती राज्यातील, जिल्ह्यातील अथवा गावातील नागरिक असतो. यावरून देशाचा अभिमान हा फक्त देशाबाहेर जाऊन न मिरवता, तो देशातदेखील तितक्याच ताठ मानेने मिरवला पाहिजे, तरच इतर देश आपल्या देशाकडे अभिमानाने पाहू शकतात, हा दिग्दर्शकाचा संदेश थेट भिडतो. गिरीश कुलकर्णी यांनी साकारलेली खेड्यातील श्रीमंत वडिलांची भूमिका, तर समीर धर्माधिकारी यांनी साकारलेली संयमी वडिलांची भूमिका वडिलांच्या दोन महत्त्वाच्या बाजू दाखवून देतात.
तरुणाईचा चित्रपट असल्यामुळे चित्रपटातील संवाद हे आजच्या पिढीचे असून, काही वेळा ते खटकत असून चित्रपटातील काही दृश्ये ही आक्षेपार्ह वाटतात. चित्रपटाची जमेची बाजू ही प्रत्येक कलाकाराचा अभिनय ठरली आहे. याशिवाय ज्या ठिकाणी चित्रीकरण आणि ज्या तांत्रिक बाबींचा सारासार विचार करून चित्रीकरण झाले, ती बाब कौतुकास्पद वाटते. या चित्रपटातून एक महत्त्वाचा संदेश देण्याची दिग्दर्शकाची धडपड नक्कीच दिसून येते, ती म्हणजे जगाच्या पाठीवर आजची पिढी शिक्षणासाठी, नोकरीसाठी गेली तरी त्यांना देशाचा जाज्ज्वल्य, आपल्या मातृभाषेचा, संस्कृतीचा अभिमान हा असलाच पाहिजे. तसेच, सध्याची पिढी ही इन्फ्लूएन्सर्सची असून नेमकी आपण सकारात्मपणे की नकारात्मकपणे इन्फ्लूएन्सर्स होत आहोत, याची शहानिशा करणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.
त्याशिवाय तरुणाईला व्यक्त होण्यासाठी कोणत्याही भाषेची अडसर ही येता कामा नये, केवळ आत्मविश्वासाने निर्भीडपणे व्यक्त होणे आणि आपल्या मतांवर, निर्णयांवर त्यांनी ठाम राहणे अशा फार महत्त्वाच्या गोष्टी या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न दिसून येतो. विनोदी अंगाने का होईना; पण सध्याच्या काळात मिळणारी माहिती ही केवळ माहितीच आहे की ज्ञान आहे, हेदेखील आपण पडताळून घेतले पाहिजे, हादेखील छुपा संदेश नक्कीच आहे. मराठी चित्रपटसृष्टीत फार कमी ‘अ’ श्रेणींचे चित्रपट असतात, त्यातील हा एक चित्रपट जरी असला तरी १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांनी किंवा मार्गदर्शकांनी किमान त्यांना चित्रपटाचे कथानक आणि त्यातील आविर्भाव समजावून सांगणे फार गरजेचे वाटते.
चित्रपट : बॉईज ४
दिग्दर्शक : विशाल देवरूखकर
कलाकार : पार्थ भालेराव, प्रतिक लाड, सुमंत शिंदे, अभिनय बेर्डे, गौरव मोरे, निखील बने, रितीका श्रोत्री, गिरीश कुलकर्णी, समीर धर्माधिकारी.
रेटींग :