सन्मान स्त्रीशक्तीचा, जागर धर्मसंस्कृतीचा!

21 Oct 2023 22:13:24
Sharadiya Navratri festival at Girgaon by Chitpavan Brahmin Sangha

‘चितपावन ब्राह्मण संघा’तर्फे गिरगाव येथे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त दि. १९ ऑक्टोबर रोजी नऊ दुर्गांचा सत्कार आणि दै. ‘मुंबई तरूण भारत’चे ‘माझे शहर, लव्ह जिहादमुक्त शहर’ अभियानाच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी होत्या-साध्वी प्रज्ञा सिंह आणि ‘लोढा फाऊंडेशन’च्या मंजू लोढा. कार्यक्रमासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून ‘चितपावन ब्राह्मण संघा’च्या पदाधिकारी अनघा बेडेकर यांनी पुढाकार घेतला होता. स्त्रीशक्तीचा जागर करत हिंदू धर्मसंस्कृतीच्या उत्थानाची प्रेरणा देणार्‍या, या कार्यक्रमाचा अंत:प्रवाह मांडणारा हा लेख...

“सीता वेताळ ही आमची भगिनी गेली २५ वर्षे चप्पल शिवते. आयुष्य सोपे नाही. पण, आयुष्यातल्या प्रत्येक संघर्षाचा यशस्वी सामना करत, ती समाजकार्यही करते. घरदार सांभाळत ती खंबीरपणे उभी आहे. स्वतःचे अस्तित्व निर्माण केले, तिचा सत्कार आपण करत आहोत.” अनघा बेडेकर यांनी नाव पुकारल्यानंतर एक गृहिणी पुढे आली. ती व्यासपीठावर येताच समोरच्या प्रेक्षकांनी एकच टाळ्यांचा गजर केला. कार्यक्रमाच्या अतिथी साध्वी प्रज्ञा म्हणाल्या की, ”सीता भगिनी हा तुझा सन्मान नाही, तर आमचाही सन्मान आहे. तुझ्यासारख्या उद्यमशील आणि संस्काराभिमानी कष्टाळू स्त्रीशक्तीसोबत आज आम्ही मंच सहभागी आहोत.” उपस्थितांनी दिलेला सन्मान, प्रेम यांमुळे त्या ताईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. सामाजिक समरसतेची कार्यकर्ता म्हणून माझ्यासाठी हा क्षण महत्त्वाचा होता. कारण, ज्या संघटनेने या भगिनीचा सत्कार केला होता, ती संघटना आहे-‘चितपावन ब्राह्मण संघ.’ यावर्षी संघटनेच्या वाटचालीला ९१ वर्षे पूर्ण झाली.

९१ वर्षांचा हा प्रदीर्घ प्रवास साधा सोपा नसला, तरीसुद्धा खूपच प्रेरणादायी आहे. या वास्तूने पारतंत्र्याचा काळही पाहिला आहे. त्याच संघाच्या वास्तूमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच समोर बसलेल्या श्रोत्यांपैकी एक-दोन लोक सोडले, तर तिला प्रत्यक्ष पहिल्यांदाच सगळे बघत होते. ते श्रोतेही चितपावन ब्राह्मण समाजाचेच होते. जातपात भेद ओलांडून माणसाच्या योग्यतेचा सन्मान आणि सत्कार करणारा हा कार्यक्रम त्यासाठीच महत्त्वाचा होता. समाजात जातीभेदाची विषारी पेरणी करणारे लोक काही कमी नाहीत. या पार्श्वभूमीवर सर्व समाजातील स्त्रीशक्तीचा सन्मान करण्यासाठी योजलेला, हा कार्यक्रम पाहून खरेच आनंदच वाटला. आमचा टक्का कुठे आहे, असे साध्या भोळ्या समाजाला विचारायला लावणार्‍या लोकांसाठी मला हा कार्यक्रम सांगणे गरजेचे आहे. कारण, हिंदू धर्मात कुणाचाच विभागलेला टक्का नसतो, तर सगळ्यांचा मिळून एक सुंदर यशस्वी सहभाग असतो, हे सांगणारा हा कार्यक्रम.

या कार्यक्रमामध्ये शर्वरी सुबोध नरवणे हिचा सत्कार करणयात आला. इयत्ता आठवीमध्ये शिकणारी ही १३ वर्षांची मुलगी. सलग तीन वर्षे तिने २००/३००/४०० मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले आहे. २०२१ साली तिची ‘इंडो सायन्स एज्युकेशन ट्रस्ट’तर्फे ‘इस्रो’च्या ‘भाविशिका’ या तीन वर्षांच्या प्रोग्रामसाठी महाराष्ट्रातून निवड झाली. तिची अहमदाबादच्या आणि बंगळुरूच्या ‘इस्रो’साठी एज्युकेशन ट्रेनिंग प्रोग्रामसाठी निवड झाली आहे. खेळाडू आणि बालवैज्ञानिक म्हणून शर्वरीची ओळख आहे. सन्मान करण्यात आलेल्या तिसर्‍या दुर्गा होत्या रेणुका व्यास. त्या नॅचुरोथेरेपिस्ट असून आरोग्य आणि महिला सक्षमीकरणासाठी काम करतात. त्या ‘काश फाऊंडेशन’च्या सहसंचालक आहेत. याच कार्यक्रमामध्ये डॉ. अपर्णा बेडेकर यांचाही सत्कार करण्यात आला. मुंबई विद्यापीठातून ‘एमए’साठी सुवर्णपदक प्राप्त झालेल्या अपर्णा यांनी २०१८ साली ‘संतकवी समर्थ रामदासाच्या साहित्याचा विवेचनात्मक अभ्यास’ या विषयात ‘पीएचडी’ केली आहे. त्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या सल्लागार मंडळावर आहेत.

तशाच मुंबई विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर हिंदू फिलोसॉफिकल स्टडीज’च्या अभ्यासमंडळाच्या सदस्य आहेत. तसेच सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासनाच्या साहित्यिक व कलाकार मानधन समितीच्याही त्या सदस्य आहेत. साहित्यिक- सामाजिक क्षेत्रात त्यांचे कार्य आहे. पाचव्या सन्मानित दुर्गा होत्या-अर्चना सालये. त्यांनी कस्टम आणि जीएसटीच्या असिस्टंट कमिशनरपद भूषविले आहे. नीरव मोदी केस आणि पनामा केसेसशोध चौकशीसंदर्भात त्यांनी काम केले आहे. सहाव्या सन्मानमूर्ती होत्या-प्रीती बापये. त्या वास्तूशास्त्रज्ञ असून, मुंबईचा विकास आराखडा २०३४ बनविण्यासाठी ‘अर्बन प्लॅनर’ म्हणून त्यांची निवड झाली. अभिनय क्षेत्रातही त्यांचा वावर आहे. त्याचबरोबर २०१३ ते २०१८ या कालावधीत त्या ब्राह्मण सभा मुंबईच्या व्यवस्थापकीय मंडळावर कार्यरत होत्या. सातव्या सन्मानीय व्यक्ती होत्या-क्रांती साळवी. बर्लिनमध्ये २०१८ आणि २०२२ लंडन येथे पारंपरिक वेशभूषा मॅरेथॉनमध्ये त्या विजेत्या ठरल्या. जागतिक स्तराच्या मॅरेथॉन स्पर्धेत त्या सहभागी झालेल्या आहेत आणि त्यांनी भारतीयांची मान उंचावली आहे. सीमा शहा आणि उर्मिला पिटकर या भगिनींचाही त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्यासाठी विशेष योगदानासाठी सत्कार करण्यात आला. डॉ. सीमा शहा या आरोग्य क्षेत्रात सामाजिक कार्य करत असून, अनेक गरजूंवर त्या मोफत आरोग्य उपचार करतात. कोरोना काळात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. उर्मिला पिटकर या ‘एमडी’ (आयुर्वेद) असून त्यांनी ‘कर्करोग व आयुर्वेद’ या विषयावर पीएचडी केली आहे. त्या योगशिक्षक असून, गेली २५ वर्षे आयुर्वेद पंचकर्म व योगचिकित्सक म्हणून कार्यरत आहेत.

या कार्यक्रमामध्ये साध्वी प्रज्ञा सिंह यांनी दै. ‘मुंबई तरूण भारत’चे ‘माझे शहर, लव्ह जिहादमुक्त शहर’ अभियानही समजून घेतले. त्यांनी ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मसंस्कृतीबद्दल उपस्थितांचे प्रबोधन केले. त्या म्हणाल्या की, ”धर्म, संस्कार नाही, तिथे समस्याच असणार. आजच्या बालिकांना आपण ‘लव्ह जिहाद’पासून वाचवू शकलो, तर पुढच्या अनेक पिढ्या आपल्या धर्मसंस्कारित राहतील. ‘धर्मो रक्षति रक्षितः’ मुलांना धर्म आणि संस्कार आज दिले नाहीत, तर भविष्यात आपल्या वृद्धत्वाच्या काळात आपली जागा वृद्धाश्रमच असणार आहे, हे लक्षात ठेवा.” साध्वी प्रज्ञा सिंह बोलत होत्या आणि समोरचा श्रोतावर्ग भावविभोर होऊन ऐकत होता. त्या पुढे म्हणाल्या की, “हिंदू धर्मासाठी आयुष्यभर काम करत राहायचा संकल्प केला आहे. त्यासाठी देशभर फिरून जागृती करायची होती. मात्र, आता ठरवले आहे की, आपल्या देशातील बाल पिढीला संस्कारित करणे गरजेचे आहे. बालकांना संस्कारक्षम, त्यातही देशधर्मनिष्ठ बनवण्यासाठी आश्रम निर्मिती करणार असून, त्यामध्ये उपस्थित सर्वांचे सहकार्य लागणार आहे.” हिंदू धर्म संवर्धनाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, ”हम दो हमारे दो या एक, हे ठीक नाही.
 
आपण देशासाठी सक्रियरित्या काही करू शकत नसलो, तर मुलांना जन्म देऊन त्यांना संस्कारित तर करू शकतो. तिकडे कितीही मुले झाली, तरी अल्ला त्यांना जगवेल, खायला देईल ही पक्की श्रद्धा आहे. त्या श्रद्धेने त्यांची मुलंही जगतात, वाढतात. आपली देवावरची श्रद्धा कमी झाली का? आपण एकापेक्षा जास्त मुलांना जन्म दिला, तर त्याचे कोण पाहिल, ही भीती वाटते का? पण, ही भीती व्यर्थ आहे. कारण, जन्माला घालणारा तो ईश्वर आहे. त्याने जन्माला घातले, तर पुढचे तो पाहील. आपण असा विचार करत नाही, आपण त्या ईश्वरावरचा विश्वास विसरलो आहोत का?” असा सवाल साध्वींनी केला. त्या पुढे म्हणाल्या की, ”दोनपेक्षा जास्त मुलं जन्माला घातली आणि त्यांचे संगोपन तुम्ही करू शकत नसाल, तर ती मुलं आम्हाला द्या, आम्ही त्यांना धर्मसंस्कारित करून संगोपन करू. ‘राष्ट्राय स्वाहा, इदं राष्ट्राय इदं न मम’ अर्थात हे जीवन राष्ट्रासाठीचे आहे आणि ते राष्ट्राला समर्पित आहे, माझे काहीच नाही.”

या कार्यक्रमामध्ये दै. ‘मुंबई तरूण भारत’तर्फे ‘माझे शहर, लव्ह जिहादमुक्त शहर’ विषयावर बोलताना मला जाणवले की, समोरचे श्रोते प्रबुद्ध होते. मात्र, ‘लव्ह जिहाद’ म्हणजे काय? याचे उत्तर त्या १०० पैकी पाच ते सहा जणांनाच माहिती होते. हो पण, धर्मसंवर्धन आणि सुरक्षिततेबाबत त्या सर्वांचे ठाम मत होते. कारण, व्याख्यानानंतर प्रश्नोत्तराच्या वेळी त्यातील अनेक श्रोत्यांनी प्रश्न उपस्थित केले. आमच्या मुलामुलींना धर्मसंस्कार मिळतील, यासाठी आम्ही खूप प्रयत्नशील आहोत. ‘लव्ह जिहाद’ आमच्या घरात आणि परिसरात घडूच नये, यासाठी आम्ही सक्रिय आणि सावध राहू. त्यासाठी आमच्या मुलामुलींचे संगोपन विशेष लक्ष आणि काळजीपूर्वक स्नेहाने करू, अशी ग्वाही ही या श्रोत्यांनी दिली. नऊ दुर्गांचा सन्मान होताना, आई दुर्गामाता आई अंबेमातेच्या शक्तीचा जागर होत होता. या मंगलसमयी समोरचा समुदाय ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात संकल्पित झाला, ही माझ्यासाठी आणि ‘लव्ह जिहाद’विरोधात संकल्प केलेल्या आपल्या दै. ‘मुंबई तरूण भारत’साठी विशेष महत्त्वाची गोष्ट होती आणि आहे.
 
दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या अभियानाचे कौतुक

दै. ‘मुंबई तरूण भारत’चे ‘माझे शहर, लव्ह जिहादमुक्त शहर’ अभियान हे अत्यंत महत्त्वाचे धार्मिक आणि सामाजिक अभियान आहे. हिंदू संस्कृतीवर आघात करणार्‍या या ‘लव्ह जिहाद’ला थोपवण्यासाठी दै. ‘मुंबई तरूण भारत’सारखे वर्तमानपत्र करत असलेले, हे कार्य अमूल्य आहे. मी दै. ‘मुंबई तरूण भारत’च्या या समाजाभिमुख, देशाभिमुख कार्याला खूप खूप शुभेच्छा देते. माता राणी दै. ‘मुंबई तरूण भारत’च्या ‘माझे शहर, लव्ह जिहादमुक्त शहर’ या संकल्पनेला सत्यात उतरवेल.
- साध्वी प्रज्ञा सिंह

अर्थात मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्यामुळे समरसतेचा मंत्र आणि हिंदुत्वाचा हुंकार या कार्यक्रमात नसेल, असे कधी तरी होईल का? त्यांच्या संकल्पनेला ‘चितपावन ब्राह्मण संघा’ने समर्थ साथ दिली आणि परिसरातील नऊ दुर्गांना इथे आमंत्रित करून सत्कार करण्यात आला. या नऊ जणी कोण आहेत, काय करतात, याचा एक संक्षिप्त आढावा घेतला तरी, या कार्यक्रमाचा हेतू आणि फलित लक्षात येते.

९५९४९६९६३८
Powered By Sangraha 9.0