भारताची गगनभरारी! गगनयान मोहिमेची पहिली चाचणी यशस्वी
21 Oct 2023 12:35:23
मुंबई : चांद्रयान-३ च्या अभूतपूर्व यशानंतर आता भारताने गगनयान मोहिमेची पहिली चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. भारतीय अंतराळ संस्था इस्त्रोने शनिवार, २१ ऑक्टोबर रोजी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून गगनयानचे क्रू मॉड्यूल यशस्वीरित्या प्रक्षेपित केले आहे.
या क्रू मॉड्यूलला टेस्ट व्हेईकल ॲबॉर्ट मिशन-1 आणि टेस्ट व्हेईकल डेव्हलपमेंट फ्लायंट (टीव्ही-डी1) असे म्हणतात. या चाचणीनंतर आणखी चार चाचण्या करुन त्यांनतर अंतराळवीरांना अवकाशात पाठवले जाणार आहे. २०२५ पर्यंत भारतीय अंतराळवीरांना अवकाशात पाठवणे हे गगनयान मोहिमेचे उद्दिष्ट आहे.
सकाळी ८ वाजताच्या नियोजित वेळेच ही चाचणी पुर्ण न होऊ शकल्याने चिंताग्रस्त अवस्थेत असलेल्या शास्त्रज्ञांनी १० वाजता चाचणी यशस्वी झाल्यानंतरच मोकळा श्वास घेतला. गगनयानाने उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदात क्रू मॅाडेल एस्केप सिस्टिमपासून वेगळे होऊन बंगालच्या उपसागरात उतरले.
२०२५ मध्ये भारत मानवरहित यान अवकाशात पाठवणार आहे. याचीच पहिली चाचणी शनिवारी पार पडली आहे. गगनयान हे भारताचे पहिले मानवरहित मिशन आहे. गगनयान मोहिमेअंतर्गत मानवाला ४०० किलोमीटर उंचीवर पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पाठवणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.
याद्वारे तीन अंतराळवीर क्रू मॉड्यूलमध्ये बसून ४०० किलोमीटर उंचीवर पृथ्वीच्या खालच्या कक्षेत फिरतील. त्यामुळे क्रू मॉड्यूलसह झालेली ही चाचणी संपूर्ण गगनयान मोहिमेसाठी महत्त्वाची आहे. अनेक अडचणी पार करत इस्त्रोने ही चाचणी यशस्वी केली आहे.