गगनयानच्या क्रू एस्केप सिस्टमची चाचणी यशस्वी

21 Oct 2023 18:33:18
crew escape system

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) शनिवारी गगनयान मोहिमेच्या क्रू एस्केप सिस्टमची यशस्वी चाचणी केली. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सकाळी १० वाजता प्रक्षेपित करण्यात आले. त्यास टेस्ट व्हेईकल अॅबॉर्ट मिशन-1 (टीव्ही-डी1) असे नाव देण्यात आले होते.

हे मिशन ८.८ मिनिटांचे होते. या मोहिमेत १७ किमी वर गेल्यानंतर, क्रू मॉड्यूल सतीश धवन अंतराळ केंद्रापासून १० किमी दूर बंगालच्या उपसागरात उतरवण्यात आले. रॉकेटमध्ये बिघाड झाल्यास, अंतराळवीराला सुरक्षितपणे पृथ्वीवर आणणाऱ्या यंत्रणेची चाचणी घेण्यात आली. चाचणी उड्डाणाचे तीन भाग होते - गगनयान मोहिमेसाठी बनवलेले सिंगल स्टेज लिक्विड रॉकेट, क्रू मॉड्यूल आणि क्रू एस्केप सिस्टम. विकास इंजिनमध्ये बदल करून हे रॉकेट तयार करण्यात आले आहे. क्रू मॉड्युलमधील वातावरण मानवयुक्त मिशनमध्ये असेल तसे नव्हते.

चाचणीची तीन उद्दिष्टे पूर्ण झाली आहेत. पहिले म्हणजे फ्लाइट कामगिरी आणि चाचणी वाहन उपप्रणालीचे मूल्यांकन. दुसरे फ्लाइट कार्यप्रदर्शन आणि वैयक्तिक सिस्टम वेगळे करणे आणि क्रू एस्केप सिस्टमचे मूल्यांकन आणि तिसऱ्या उद्दिष्टात क्रू मॉड्युलची वैशिष्ठ्ये आणि उच्च उंचीवर त्याच्या प्रणालीची कार्यक्षमता आणि पुनर्प्राप्ती यांचा समावेश आहे.

फ्लाइट टेस्ट व्हेईकल अॅबॉर्ट मिशन 1 मध्ये कोणतीही अनुचित घटना घडल्यास अंतराळवीरांना वाचवण्यासाठी ही क्रू-एस्केप सिस्टम उपयुक्त ठरेल, असे इस्रोने म्हटले आहे. टेक-ऑफ दरम्यान मिशन एरर असल्यास, यंत्रणा क्रू मॉड्यूलसह वाहनापासून वेगळी होईल, काही काळ उडेल आणि श्रीहरिकोटापासून 10 किमी अंतरावर समुद्रात उतरेल. त्यात उपस्थित असलेल्या अंतराळवीरांना नौदलाकडून समुद्रातून सुखरूप परत आणले जाईल, असेही सांगण्यात आले आहे.

पंतप्रधानांकडून कौतुक

मिशन गगनयान टीव्ही डी1 चाचणी उड्डाणाच्या यशस्वी प्रक्षेपणाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. भारताचा पहिला मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम साकार होण्याच्या दिशेने या यशाने देशाला एक पाऊल पुढे नेले आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली. एक्स वरील आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले की,भारताचा पहिला मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम, गगनयान साकार करण्याच्या दिशेने हे प्रक्षेपण आपल्याला एक पाऊल जवळ घेऊन जात आहे. इस्रो मधील आपल्या शास्त्रज्ञांना माझ्या शुभेच्छा.

Powered By Sangraha 9.0