सुमन साळगट : एक व्यक्तीचे अनेक पैलू

21 Oct 2023 21:50:53
Article on Suman Salgat

सीतेला रावणाच्या लंकेतून सोडवण्यासाठी श्रीराम, लक्ष्मण, वानरराज सुग्रीव, महावीर हनुमान, जांबुवंत आणि सर्व वानर सेना निघाली होती. त्यामुळे त्यांनी लंकेत जाण्यासाठी सेतू बांधायचे ठरवले. सर्व वानर मोठे-मोठे दगड आणून, त्यावर श्रीराम असे प्रभूचे नाव लिहून समुद्रात टाकत होते. प्रभू नामाच्या महिमेमुळे ते दगड समुद्रात तरंगत होते. हळूहळू सेतू आकार घेत होता. अशात एक छोटीशी खार तिच्या इवलुशा हातात बसेल असे छोटे दगड, माती नेऊन पुलावर टाकत होती. तिलासुद्धा देवाला मदत करायची होती.

तद्वत अण्णांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यामध्ये अनेक हितचिंतक संस्थेला देणगी देत असतात. पण, संपूर्ण आयुष्यभर दुसर्‍यांच्या घरी मोलकरणीचे काम केलेल्या खारुताईने आपली थोडी-थोडी का होईना, पुंजी साठवली, एकत्रित केली आणि आयुष्याच्या शेवटच्या रंगमचावर ती साठविलेली पुंजी नऊ लाख रुपये संस्थेला दानरुपी दिली. ही माहिती आहे-सुख निवास वृद्धाश्रमातील ७२ वर्षांच्या सुमनताई साळगट यांची. सोमवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी त्यांचे दुःखद निधन झाले. त्यानिमित्ताने त्यांचा कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा...

त्यांचे पूर्ण नाव सुमन धनगरमाळी, गावाचे नाव जारकरवाडी ता. आबेंगाव जि. पुणे. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांचे लग्न रघुनाथ साळगट रा. संगमनेर यांच्याशी झाले. अवघ्या दोन वर्षांत सुमन साळगट यांना त्यांच्या पतीने सोडले आणि दुसरे लग्न केले. आईला सांभाळण्याकरिता सुमन साळगट यांनी दुसरे लग्न केले नाही. त्यांनी ग. दि. माडगुळकर, अण्णासाहेब आवटे आमदार आबेंगाव तालुका (डेक्कन येथील बंगल्यावर) यांच्याकडे दहा वर्षे मोलकरणीचे काम केले. त्यानंतर बॅनर्जी कुटुंबांची त्यांनी ४५ वर्षे सेवा केली. त्या अमेरिकेमध्येसुद्धा दहा वर्षे बॅनर्जी परिवाराबरोबर होत्या.

संस्थेच्या वृद्धाश्रमात त्या २०११ साली दाखल झाल्या. अतिशय शांत स्वभावाच्या सुमनताईंची दुसर्‍यांना मदत करण्याची वृत्ती कौतुकास्पद होती. मागील महिन्यात हॉस्पिटलमध्ये त्यांना अ‍ॅडमिट केले होते. त्यांना हृदयाचा त्रास होत होता. त्यांनी बॅनर्जी कुटुंबातील मुलाला सांभाळले होते आणि तो मुलगा आज अमेरिकेमध्ये मोठा हृदयरोगतज्ज्ञ आहे. त्यांनी अमेरिकेमधून फोन करून माई मंगेशकर हॉस्पिटलमधील डॉक्टरांशी चर्चा करून सल्ला दिला. त्यानंतर त्या बर्‍या झाल्या होत्या.

त्या नेहमी म्हणत असत, ‘मी गरीब आहे, माझ्याकडे साठविलेली रक्कम फार नाही. पण, माझ्या मृत्यूनंतर मी संस्थेला दान करणार आहे.’ अशा प्रकारचे इच्छापत्रच त्यांनी संस्थेला दिले होते. तसेच त्यांची काही वडिलोपार्जित जमीन गावाला आहे, ती जमीन संस्थेने शोधावी आणि संस्थेच्या कार्याला वापरावी, असे त्या म्हणत असत. अशा या संस्थेच्या खारुताईला संस्थेच्यावतीने भावपूर्ण श्रद्धाजंली...

(शब्दांकन : सुरेश नवले, प्रधान कार्यालय, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था)
Powered By Sangraha 9.0