मुंबई : “आज शेतीपुढे विविध समस्या आहेत. या समस्यांतून बाहेर पडण्यासाठी आणि शाश्वत शेतीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शेतकर्यांनी कमीत कमी शेतजमिनीतून जास्तीत जास्त आर्थिक उत्पन्न घ्यावे. त्यासाठी प्रत्येक शेतकर्याने एक तरी गाय पाळली पाहिजे. या माध्यमातून सेंद्रिय शेतीची कास धरावी,” असा मूलमंत्र पुणे येथील ‘अभिनव फार्मर क्लब’चे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर बोडके यांनी दिला.
वडाळा (मुंबई) येथील ‘निको’ सभागृहात पितांबरी प्रायोजित ‘कृषी विवेक’ प्रकाशित ‘गोष्टी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या’या ऐतिहासिक ग्रंथाचे ‘अभिनव फार्मर क्लब’चे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर बोडके, पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई व ‘हिंदुस्थान प्रकाशन’ संस्थेचे विश्वस्त विवेक देवगिरीकर आदी मान्यवरांच्या हस्ते नुकतेच प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी बोडके यांनी उपस्थितांना संबोधित केले. ‘गोष्टी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या’ या ग्रंथातून शेतकर्यांना शेतीचा नवीन मार्ग आणि प्रेरणा मिळते, त्यामुळे प्रत्येक शेतकर्यांनी हा ग्रंथ संग्रहात ठेवावा, असेही आवाहन त्यांनी केले. यावेळी सा. ‘विवेक’चे कार्यकारी प्रमुख राहुल पाठारे यांच्यासह कृषी, उद्योग, सहकार, कायदा आदी क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना रवींद्र प्रभुदेसाई म्हणाले की, “शेतकर्यांनी आपला माल सर्वसामान्य उत्पादन म्हणून न विकता त्याला ’ब्रॅण्ड’ म्हणून विकायला हवं. तरच त्यांच्या मालाला योग्य भाव मिळेल. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतकर्यांचे उत्पन्न वाढविण्यास मदत होत आहे, येत्या काळात शेतकरी उत्पादक कंपन्या सहकाराचे नवे मॉडेल म्हणून उदयाला येतील. त्यामुळे ‘गोष्टी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या’ हा ग्रंथ शेतकरी उत्पादक कंपनी चळवळीत मोलाची भर घालणारा आहे.”
‘बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्क’च्या अध्यक्षा व ‘गोष्टी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या’ ग्रंथाच्या अतिथी संपादक सुनेत्रा पवार यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन या कर्यक्रमात करण्यात आले. ‘कृषी विवेक’चे संचालक आदिनाथ पाटील यांनी ‘कृषी विवेक प्रकल्पा’चा उद्देश व उपक्रमाची माहिती सांगितली, तर कार्यकारी संपादक विकास पांढरे यांनी आपल्या मनोगतातून ग्रंथाचे स्वरूप उलगडून दाखविले. यानंतर मूल्यसाखळी, प्रक्रिया उद्योग, पिके, फळबाग आदी कृषी घटकांत उल्लेखनीय कार्य करणार्या कळंब येथील मराठवाडा ‘अॅग्रो शेतकरी उत्पादक’ कंपनीचे अध्यक्ष बाळासाहेब गित्ते, हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी येथील भुदरगड ‘नॅचरल शेतकरी’ कंपनीचे संचालक बाळासाहेब सोळांकुरे-पाटील, लांजा तालुक्यातील गवाणे येथील रत्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी संस्थेचे अध्यक्ष जयवंत विचारे आणि पुणे येथील ‘महा ड्रॅगन फ्रूट’चे संस्थापक मधुकर पोतदार आदींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. निमेश वहाळकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले. ग्रंथाचा आर्थिक भार उचलल्याबद्दल ‘पितांबरी’ समूहाचे आभार मानण्यात आले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.