समुद्र देवतांचे किनार्यावरील समाज भक्तिभावाने पूजा करतात. बर्याचदा गुहा किंवा दगडातून त्यांनी आकार घेतलेले असतात. त्यांना ‘स्वयंभू दैवते’ म्हणतात. असेच एक स्वयंभू देवस्थान पालघर जिल्ह्यत एडवण या गावी आहे. मनात काही आशा घेऊन देवीच्या दर्शनाला गेलात, तर आपल्या आशा ती पूर्ण करते. म्हणून या देवीला आशापुरा देवस्थान असे म्हटले जाते.
आईचा समुद्रात निवास
पूर्वी समुद्राच्या भरतीचे पाणी ओसरून ओहोटी लागली की, गुडघाभर पाण्यातून आत समुद्रातल्या, त्या गुहेत देवीच्या दर्शनाला जावे लागत असे. साधारण पाच मिनिटे चालल्यानंतर पुढे एक मोठा खडक आहे. तो चढून गेल्यावर एक गुहेचे मुख आहे. त्या गुहेत उतरून काही अंतर सुरुवातीला दगडाखालून वाकून, तर पुढे अगदी सरपटत चालावे लागते. वर दगडावर चढून गेल्यावर मात्र तिन्ही बाजूला खडकांना धडाके देणारा समुद्र, तर मागच्या बाजूस खारफुटीच्या झुडुपातून किनार्यापर्यंत गेलेला रस्ता दिसतो. हे दृश्य अतिशय नयनमोहक आहे. आता मात्र भरती सुरू झाल्याने अडकलेल्या भाविकांना मंदिरात ताटकळत राहावे लागत नाही. त्यांच्या परतीसाठी सिमेंट काँक्रीटचा सुकर मार्ग तयार करण्यात आला आहे.
असे आहे मंदीर
किनार्यांना खडकांना वेढून राहणारा समुद्र, खळाळून सतत पायाशी फूटणार्या लाटा, शहारा उठवणारा वारा यात आपण रमून गेलो की, पुढे आभाळात पश्चिमेला रंग जमू लागतात. सूर्य जसजसा खाली उतरतो, ते रंग क्षितिजाशी दाट होऊ लागतात. सूर्य समुद्राशी पोहोचतच नाही. मग त्या रंगांत दिसेनासा होतो. अशी संध्याकाळ झाली की मंदिराचे दरवाजे बंद होतात.
कसे पोहोचाल
मंदिरात पोहोचण्यासाठी पश्चिम रेल्वेवरील पालघर स्थानकावर उतरून पश्चिमेस रिक्षा थांबा आहे. तेथून एडवण येथे जाणारी किंवा रिक्षा पकडावी. आशापूर देवी सांगितल्यासही सहज रिक्षा मिळू शकते.