पर्यावरण संशोधनाच्या ‘संध्ये’ची माळ

20 Oct 2023 11:18:42
sandya pawale


 वनस्पतीशास्त्रात पदवी, पदव्युत्तर, एमफील आणि डॉक्टरेट असे सर्वोच्च शिक्षण प्राप्त करून गेल्या तीन दशकांपासून हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानदान देणार्‍या प्राध्यापिका संध्या पावले यांनी सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण संवर्धानासाठी वाहून घेतले आहे. वसुंधरेची लेक असलेल्या संध्या पावले युगातील या नवदुर्गाच आहेत...



धुळ्यासारख्या ग्रामीण आणि आदिवासी जिल्ह्यात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण केलेल्या संध्या पवळे गेली ३० वर्षांपासून ठाण्याच्या बांदोडकर कॉलेजमध्ये विद्यादानाचे काम करीत आहेत. दरम्यानच्या काळात त्यांनी पदव्युत्तर शिक्षणानंतर वनस्पतीशास्त्रात ‘एमफील’ आणि ‘पीएच.डी’चा अभ्यासक्रम केला. जीवशास्त्रातील अत्यंत किचकट अशा प्लांट टिश्यू कल्चरच्या अभ्यासक आणि संशोधक असलेल्या संध्या पावले यांनी आपल्या संपूर्ण शैक्षणिक कारकिर्दीत नेहमीच क्रमांक एक पटकावला त्यातूनच त्या सुवर्ण पदकाच्याही मानकरी ठरल्या आहेत. दोन दशकांपूर्वी प्लांट ‘टिश्यू कल्चर’ या विषयांत संशोधन करणे फारच जिकरीचे. संशोधनासाठी आवश्यक असलेले साहित्य आणि साधनांची कमतरता असूनही त्यांनी प्लांट ‘टिश्यू कल्चर’ या विषयात डॉक्टरेट पूर्ण केली. संशोधन करत असताना, एकीकडे आपले कुटुंब आणि दुसरीकडे विद्यादानाचे कार्य कोणताही खंड न पडू देता सुरूच ठेवले. त्यामुळेच त्यांनी गेल्या ३० वर्षांत २० हजारांहून अधिक विद्यार्थी घडवले आहेत. त्यातील शेकडो विद्यार्थी आज ठिकठिकाणी उच्चपदस्थ आहेत.



वनस्पतीशास्त्रात शिक्षण आणि संशोधन केल्यामुळे संध्या यांना पर्यावरणाबाबत प्रचंड जिव्हाळा. त्यातूनच त्या पर्यावरणावर आधारित स्पर्धा अथवा प्रश्नमंजुषा कार्यक्रमात परीक्षक म्हणूनही भूमिका बजावतात. शिक्षण क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या बालभारती अभ्यासक्रमाच्या मंडळात त्यांचा सहभागही होता. २०१८-१९ आणि २०१९-२० या कालावधीत त्यांनी बालभारतीच्या मंडळावर सक्रिय भूमिका बजावली. या काळात त्यांनी अकरावी, बारावीच्या जीवशास्त्र विषयासाठी काम केले आहे. वैज्ञानिक आणि प्राध्यापकी पेशा असूनही संध्या यांनी विविध कला आणि छंद जोपासले आहेत. त्यांना गायन आणि नृत्याची आवड आहे. आपले छंद म्हणून त्या अजूनही सामाजिक सणउत्सवांमध्ये आवर्जून सहभाग घेतात. पर्वतारोहण करण्याचीही संध्या यांना आवड असून त्यांनी कळसुबाई शिखर सर केले आहे. त्याचबरोबर शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांनासोबत घेऊन विविध ठिकाणच्या दुर्गम भागांना भेट देऊन तेथील वनस्पती आणि पर्यावरणाचा सखोल अभ्यास केला आहे.



केंद्र सरकारने अलीकडेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केले. त्यात योगदान देण्याची प्राध्यापिका संध्या पावळे यांना इच्छा आहे. शैक्षणिक क्षेत्रात बदल घडवणार्‍या या योजनेसाठी काम करण्याची प्रबळ इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. जीवनात आलेला प्रत्येक क्षण मनसोक्त जगा, असं आयुष्याचं सूत्र दिलखुलासपणे सांगणार्‍या आजच्या नवदुर्गा संध्या पावले यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!




Powered By Sangraha 9.0