महासागरातील प्लास्टिक प्रदूषण

    02-Oct-2023
Total Views |


plastic pollution


अतिरेकी प्लास्टिक वापरामुळे केवळ प्रदूषणच नाही, तर अनेक दुष्परिणाम भोगण्याची वेळ आली आहे. महासागरातील प्लास्टिक प्रदूषणाचा मोठा ढीग सागरी परिसंस्थेवर आणि प्राण्यांवर काय परिणाम करतोय, याचा आढावा घेणारा हा लेख...

सागरी परिसंस्थांचे प्लास्टिकमुळे हानी होण्याचे मुख्य कारण म्हणजे सागरी प्राण्यांनी प्लास्टिक गिळणे, तसेच प्लास्टिकमुळे त्यांच्या विविध अवयवांत प्लास्टिक गुंतल्यामुळे गुदमरून त्यांचे मृत्यू होणे. समुद्री पक्षी, मोठे मासे, सागरी सस्तनी आणि कासवे प्लास्टिक कचर्‍याला अन्न समजून, चुकून खातात आणि त्यानंतर त्यांच्या आतड्यामध्ये प्लास्टिक गेल्यामुळे त्यांचा मृत्यू होतो, अशा अनेक ठिकाणी नोंदी मिळालेल्याआहेत. प्रवाळांच्या भित्तीकांवर प्लास्टिक पसरल्याने त्यांची जगण्याची क्षमता कमी होते. मायक्रोप्लास्टिकमुळे प्रवाळांची वाढ खुंटते. आधीच जागतिक तापमानवाढीमुळेप्रवाळ प्रजाती धोक्यात आहेतच. प्रवाळ भित्तिका ही सर्वसमावेशक परिसंस्था असते. मायक्रोप्लास्टिकमुळे त्यावर दीर्घकालीन परिणाम होत असतात. समुद्राच्या पाण्यात दीर्घकाळासाठी प्लास्टिक साचून राहिल्यावर याच प्लास्टिकच्या पृष्ठभागातून त्यातील विषारी घटक झिरपून बाहेर येतात आणि प्लास्टिक कचर्‍यामध्ये साचून राहतात. असे घटक सागरी प्राण्यांच्या शरीरावर, त्यांच्या पचनसंस्थेतून आणि शरीरातल्या पेशींत संचयित स्वरुपात राहतात. अन्नसाखळी व अन्नजाळ्याच्या साहाय्याने अखेरीस मानवाने खाल्लेल्या सागरी अन्नातून मानवाच्या शरीरात शिरतात. म्हणून ज्यावेळी सागरी परिसंस्था प्लास्टिकमुळे प्रदूषित होते, त्यावेळी अन्नसुरक्षा आणि अन्नाची गुणवत्ता यावर परिणाम होतो.


प्लास्टिकमुळे प्राण्यांच्या अंगावर आणि अंतर्गत जखमा होतात. त्यांना वेगवेगळे संसर्ग होतात. पोहोण्याची क्षमता कमी होते. तरंगणार्‍या प्लास्टिकमुळे सागरी जैवविविधता व अन्नजाळे घातकरित्या बदलत आहे, हे लक्षात आले आहे, हे सर्वांच्याच आरोग्याला अत्यंत घातक ठरू शकते आणि या दृष्टीने संशोधन करण्यात येत आहे. प्लास्टिकच्या प्रदूषणाने अन्नसुरक्षा आणि गुणवत्ता त्याचप्रमाणे मानवी आरोग्य, किनारपट्टीने चालणारे पर्यटन आणि हवामान बदल या विविध महत्त्वाच्या बाबींवर विघातक परिणाम होत असतात. जागतिक पातळीवरील हे सत्य लक्षात आल्यामुळे सर्व देश आता कायदेशीर ठराव करून सागरी प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी कटिबद्ध होत आहेत.


जिथे लोकसंख्या दाट आहे, पर्यटनासाठी अनेक लोकांची वर्दळ असते, अशा ठिकाणी आणि जिथे जनसामान्याला प्लास्टिक हे केवढे मोठे त्या प्रदूषित आहे, याची कल्पना नाही, अशा ठिकाणी प्रदूषणाचा प्रश्न अतिशय गंभीर होतो. सध्याच्या जमान्यात प्लास्टिक हे समुद्रातील सर्वांत मोठे प्रदूषक ठरले आहे. समुद्रात शिरणारे प्लास्टिक संपूर्णपणे जमिनीवरूनच समुद्रात घुसते. पृथ्वीच्या प्रत्येक खंडाच्या किनार्‍यांवर प्लास्टिक पसरलेले आढळते. नागरी वस्त्या आणि शहरातून निचरा होणार्‍या पाण्याच्या गटारातून प्लास्टिक समुद्रात शिरत असते. त्याचप्रमाणे घनकचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने होत नसेल, तर तेथूनही बरेच प्लास्टिक समुद्रात जाते. औद्योगिक घडामोडी, बांधकाम व्यवसाय, बेकायदेशीर कचरा टाकून देणे अशा गोष्टींनी ही समस्या जास्त तीव्र होते. मासेमारी व्यवसाय, समुद्री दळणवळण, आणि मत्स्यशेती या कारणांनी ही प्लास्टिक प्रदूषण वाढते.


बर्‍याच देशात प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक असणार्‍या पायाभूत सुविधा नाहीत. त्याचप्रमाणे प्लास्टिक जाळणे किंवा त्याचे पुनर्चक्रीकरण करणे या बाबी जरी ‘वर्तुळाकार आर्थिक व्यवस्थेत’ लाभदायक असल्या तरी अयोग्य व्यवस्थापनामुळे हा प्रदूषणाचा प्रश्न वाढतच चाललेला आहे. समुद्राप्रमाणेच नद्यांमध्येदेखील मोठ्या प्रमाणात प्लास्टिक टाकण्यात येते, जे कालांतराने समुद्रातच शिरते. कायदेशीर किंवा बेकायदेशीर प्लास्टिक कचर्‍याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारा व्यापार त्याच्यामुळे देखील परिसंस्थांची हानी होते. प्लास्टिक प्रदूषणाचा पर्यटन व्यवसायावर विपरित परिणाम होतो. निसर्ग सौंदर्य नष्ट होते. पर्यटनापासून मिळणार्‍या आर्थिक फायद्यात तूट होते आणि किनार्‍याची सफाई आणि व्यवस्था पाहण्यासाठी खूप मोठा खर्च करावा लागतो. याच्यामुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर, वन्यजीवांवर आणि माणसांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.