भंडार्ली डंपिंग बंद होणार?; मनसे आ. राजू पाटील यांनी घेतली ठामपा आयुक्तांची भेट

02 Oct 2023 19:56:46
MNS MLA Raju Patil Mets Commissioner Bangar

ठाणे :
भंडार्ली डंपिंगचा वाद शमण्याची चिन्हे आहेत. मनसे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी रविवारी भंडार्ली येथे वाहने रोखून धरली होती. दरम्यान, आ. पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची मुख्यालयात भेट घेऊन डंपिंग बंद करण्याचा आग्रह धरला. त्यावर २५ ऑक्टोबरनंतर हा प्रकल्प बंद करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त बांगर यांनी यावेळी दिल्याचे आ. पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

दिवा डंपिंग बंद करून ठाणे महापालिकेकडून भंडार्ली येथे कचरा टाकण्यात येत होता.मात्र या डंपिंगला भंडार्ली ग्रामस्थांनी विरोध दर्शवला होता. अखेर वर्षभरासाठी मुदत दिली होती. डंपिंग बंद पाडण्यासाठी भंडार्ली ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवून अनेक आंदोलन केली. मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील हे डंपिंग बंद करण्यासाठी पालिका आयुक्तांसोबत अनेक बैठका घेतल्या. तात्पुरत्या स्वरूपात हे डम्पिंग सुरू असून प्रकल्प कार्यान्वित होताच ३० सप्टेंबर रोजी डंपिंग बंद करणार असल्याचे आश्वासन पालिका आयुक्तांकडून देण्यात आले होते.

मात्र अद्यापही डंपिंग बंद न झाल्यामुळे १४ गावांतील ग्रामस्थ आक्रमक झाले. आणि रविवारी आ. राजु पाटील यांच्या नेतृत्वाखाली भंडार्ली येथे कचऱ्याच्या गाड्या रोखण्यात आल्या. तेव्हा ठाणे महापालिका घनकचरा विभागाचे उपायुक्त तुषार पवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. यासंदर्भात आयुक्तांसोबत एक बैठक घेतली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानुसार सोमवारी दुपारी पालिका मुख्यालयात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या दालनात झालेल्या बैठकीला मनसेचे आमदार प्रमोद पाटील यांच्यासह १४ गाव सर्वपक्षीय विकास समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत प्रकल्प बंद करण्यासाठी प्रशासनाला भेडसावत असलेल्या समस्या आणि त्यावर कशाप्रकारे मात करण्याचे काम सुरू आहे, याची माहिती आयुक्त बांगर यांनी बैठकीत दिली. तसेच येत्या २५ ऑक्टोबरनंतर हा प्रकल्प बंद केला जाणार असून याठिकाणी एकही कचरागाडी जणार नाही, असे आश्वासन आयुक्त बांगर यांनी दिले आहे. अशी माहिती आमदार पाटील यांनी दिली. दरम्यान, त्यानंतर जर गाडी आली तर ती आम्ही जाळून टाकू असा इशारा आ. राजू पाटील यांनी दिला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0