कंत्राटी पद्धतीने तहसीलदार भरती होणार नाही! 'ती' जाहिरात रद्द

02 Oct 2023 15:28:25
Government of Maharashtra Contractual Talathi Bharti Opposed

मुंबई :
राज्य शासनाच्या वतीने राज्यात नोकरभरती करण्यात येत आहे. राज्य शासनाने सदर भरती कंत्राटी पध्दतीने करण्याचे योजिले होते. त्यामुळे राज्य शासनाच्या वतीने कंत्राटी पद्धतीने तहसीलदार, नायब तहसीलदार नियुक्त करण्याबाबत प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीवरून टीका झाल्यानंतर ही जाहिरात रद्द करण्याचे आदेश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात कंत्राटी पद्धतीने तहसीलदार नियुक्त करण्याबाबत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याला उमेदवारांकडून विरोध करण्यात आला. तसेच, कंत्राटी पद्धतीने तहसीलदार भरण्याचे शासनाचे धोरण नाही. राष्ट्रीय प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी अनुभवी निवृत्त अधिकाऱ्यांना मदतीला घेतले जाते. मात्र त्याची जाहिरात प्रसिद्ध झाल्याने कंत्राटी पद्धतीने तहसीलदार भरले जाणार असा गैरसमज झाल्याचे स्पष्टीकरण जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

त्याचबरोबर, तात्काळ ती जाहिरात रद्द करा, अशा स्पष्ट सूचना जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना देऊन याबाबत सविस्तर खुलासा मागविल्याचेही विखे पाटील यांनी सांगितले. राज्यातील विविध रिक्त पदांसाठी होणाऱ्या भरतीकरिता कंत्राटी पध्दतीस विरोध करण्यात येत आहे.

Powered By Sangraha 9.0