‘ब्ल्यू इकोनॉमी’चा देशप्रेमी अभ्यासक!

02 Oct 2023 21:55:10
Article On Captain Gajanan Karanjikar

देशाच्या सुरक्षित विकासासाठी, सागरी अर्थकारणासाठी गेली तीन दशके वैचारिक आणि प्रत्यक्ष समन्वय कार्य करणारे कॅप्टन गजानन करंजीकर. त्यांच्या विचारकार्याचा घेतलेला मागोवा...

भारताला लाखो चौ.किमीचे विशेष आर्थिक क्षेत्र लाभले आहे. मात्र, भारतामध्ये सागरीमार्गे वाहतूक केवळ सहा टक्के इतकीच होते. जर सागरीमार्गे वाहतूक वाढली, तर आपले सागरी किनारे सुरक्षित होतील आणि संपन्नही होतील,” असे कॅप्टन गजानन करंजीकर यांचे मत. अर्थात, कॅ. गजानन यांचा समुद्र आणि सामरिक सुरक्षा तसेच सामरिक अर्थव्यवस्थेचा गाढा अभ्यास. सध्या ते सध्या एका ‘मेरीटाईम कंपनी’मध्ये व्यवस्थापकीय संचालक आहेत.

तसेच ते ‘ऑल इंडिया मॅरीटाईम पालयट असोसिएशन’चे अध्यक्ष असून, ‘सी फेरर राईट्स’ समितेचेही अध्यक्ष आहेत. ‘ब्ल्यू इकोनॉमी’ अर्थात सागरी अर्थव्यवस्थेचे ते आंतरराष्ट्रीय स्तरावरचे मार्गदर्शक, अभ्यासक. सागरी अर्थव्यवस्थेसंदर्भात त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे आणि विपुल लेखनही केले. सागरी अर्थव्यवस्थेवर कॅ. गजानन अगदी अधिकारवाणीने बोलू शकतात. कारण, जगभरातल्या ८० देशांचा त्यांनी सागरी अर्थव्यवस्थेसंदर्भात अभ्यास केला आहे. मोठ्या सागरी सीमा लाभलेल्या पाच देशांमध्ये त्यांनी अनेक वर्षे निवासही केला आहे. सध्या कॅ. गजानन कामानिमित्त दुबई येथे वास्तव्यास आहेत.

समुद्र आणि समुद्रासंदर्भातीलच सगळे घटक यांच्याशी कॅ. गजानन यांची नाळ जुळलेली, ऋणानुबंध जुळलेले. तसे पाहायला गेले तर कॅ. गजानन आणि समुद्र, इतकेच काय समुद्रातील मत्स्य संपत्तीशी त्यांचा दुरान्वयेही संबंध नव्हता. कारण, ब्राह्मण समाजाचे करंजीकर कुटुंब हे मूळचे धुळ्याचे. भालचंद्र करंजीकर आणि आशा करंजीकर हे दोघेही शिक्षक. दोघांना तीन अपत्ये. त्यापैकी एक गजानन. भालचंद्र हे रा. स्व. संघाचे स्वयंसेवक. ते मुलांना पूज्य हेडगेवार तसेच पूज्य गोळवलकर गुरुजींच्या गोष्टी सांगत. देश, धर्म, समाज यासंदर्भात जाज्ज्वल्य अभिमान वाटावा, अशा घटना, इतिहास मुलांना सांगत. ते मुलांना सांगायचे की, “देशप्रेमाच्या गप्पा मारणे म्हणजे आपण मोठे देशप्रेमी आहोत, असे नाही, तर देशासाठी स्वतः कार्य करायला हवे.“ साहजिकच मुलांमध्ये राष्ट्रप्रेम आपसूक निर्माण झाले.

गजानन वयाच्या पाचव्या वर्षी संघ शाखेत जाऊ लागले. त्यांचे मोठे बंधू दीपक हे त्यावेळी संघशिक्षक होते. संघशाखेत गेल्यानंतर गजानन यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आणि बुद्धी, ज्ञानामध्ये आणखीन सकारात्मक बदल झाले. ते आठवीला असताना संघशिक्षक झाले. त्यांच्या शाखेत दररोज ४० ते ५० मुलं यायची. त्यावेळी भैय्याजी जोशी हे धुळे जिल्हा संघप्रचारक होते. त्यावेळी त्यांच्या आणि इतर ज्येष्ठ संघ स्वयंसेवकांच्या नि:स्पृह नि:स्वार्थी आणि प्रखर देशनिष्ठ जीवन पाहून गजानन यांनी ठरवले की, आपणही राष्ट्रासाठी तन-मन-धन अर्पण करायला हवे. जनसेवा- देशसेवा करायला हवी. त्यामुळे वडिलांच्या इच्छेनुसार त्यांनी डॉक्टर व्हायचे ठरवले. मात्र, बारावीनंतर अवघ्या दोन टक्क्यांनी त्यांचा मेडिकलचा प्रवेश हुकला. त्यावेळी गजानन यांना वाईट वाटले.

मात्र, त्याचकाळात ‘मेरीटाईम’ संदर्भात भरती होणार असल्याची जाहिरात त्यांनी पाहिली. तिथे त्यांनी अर्ज केला. अटीशर्ती परिपूर्ण करीत एका वर्षांनी ते ‘मेरीटाईम’मध्ये रुजू झाले. त्यावेळी त्यांना अनेकांनी समजावले की, ’अरे आपण धुळेकर समुद्राचे अंतरंग आपण कसे ओळखू? तू समुद्रात कसे काम करू शकशील का?’ पण, गजानन यांनी ठरवले की, अज्ञाताच्या वाटा मार्गक्रमण करण्यातच साहस आहे. तसेच जिथे जाऊ तिथे समाज आणि देशाच्या हिताचेच कार्य करायचे आहे. त्यामुळे ते नोकरीला रुजू झाले. त्यानंतर अनेक प्रशिक्षण पूर्ण करीत, परीक्षा देत दहा वर्षांनी ते २००० साली जहाजाचे कॅप्टन झाले.

या काळात जहाज वादळात सापडणे, जहाजावर लुटारूंनी हल्ला करणे, जहाजात चोर आणि अवैधरित्या लोक घुसणे, अशा एक ना अनेक परीक्षा घेणार्‍या घटना घडल्या. मात्र, गजानन या सगळ्या परीक्षांमधून तावून सुलाखून निघाले. संघ स्वयंंसेवकाने जिथे असेल, तिथे जनसेवा आणि देशसेवेचे व्रत अंगीकारले पाहिजे, हा वसा जोपासणार्‍या गजानन यांनी देशातील २०० बंदरांतील जवळ-जवळ ५०० पालयट व्यक्तींची संघटना उभी केली. तसेच देशभरातील ६० संघटनांचे एकत्रीकरण करून देशातील दहा लाखांपेक्षा जास्त खलाशांसाठी संघटना स्थापन केली. बंदरावर काम करणार्‍या या पायलट आणि खलाशांच्या हक्कासाठी गजानन सातत्याने प्रयत्न करतात आणि त्यात त्यांना यशही आले.

जवळ जवळ ३५ वर्षे समुद्र, जहाज आणि लहरी निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्याने गजानन यांना निसर्ग आणि सागराचा स्वभाव ओळखण्याची कला प्राप्त झाली. आकाशातले ढग हे समुद्रात काय परिस्थिती निर्माण करणार आहेत, याचा अंदाज त्यांना अचूक कळू लागला. जगभर समुद्रात फिरत असताना प्रत्येक देशाचा सागरी किनारा, त्या देशाच्या अखत्यारित येणार्‍या समुद्री भागांचे संरक्षण, विकास आणि वापर कसा केला, याचा अभ्यास ते करू लागले. त्यातूनच त्यांनी एक ठाम निष्कर्ष काढला की, एखाद्या भूभागाचा विकास उद्यान म्हणून करताना जसा आराखडा तयार केला जातो, तसाच आपल्या देशाला लाभलेल्या सागरी भागाचा विकास पद्धतशीरपणे केला पाहिजे.

सागरी खनिज संपत्ती, सागरी ऊर्जा, सागरी पर्यटन आणि त्यातून सागरी अर्थकारण उभे केले पाहिजे. त्यांनी नुसता निष्कर्षच काढला नाही, तर त्यानुसार एक तर्कविज्ञान, सुसंगत आराखडाच तयार केला. विश्वगुरूपदाकडे वाटचाल करीत असणार्‍या भारताच्या ‘ब्ल्यू इकोनॉमी’चे देशप्रेमी अभ्यासक म्हणजे कॅ. गजानन करंजीकर. सुरक्षित संपन्न सागरी अर्थकारणाचा त्यांचा ध्यास भवितव्यात प्रत्यक्षात साकार होईल, हे नक्की!

९५९४९६९६३८
Powered By Sangraha 9.0