नक्षलवादाचे उच्चाटन करण्यात वनवासी युवकांची भूमिका महत्त्वाची

19 Oct 2023 18:17:19
amit shah

नवी दिल्ली :
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी बुधवारी वनवासी युवा आदानप्रदान कार्यक्रम (टीवायईपी) अंतर्गत २०० वनवासी युवकांशी संवाद साधला. यावेळी देशातून नक्षलवादाचे उच्चाटन करण्यासाठी वनवासी युवकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत गृहमंत्री शाह यांनी व्यक्त केले.

वनवासी युवकांशी संवाद साधताना केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, आज वनवासी समाजातील लोकांसाठी भरपूर संधी उपलब्ध आहेत. वनवासी महिला द्रौपदी मुर्मू भारताच्या राष्ट्रपती आहेत, ही अतिसय़ अभिमानास्पद बाब आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्वस्व अर्पण करणाऱ्या वनवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०० कोटी रुपये खर्चून देशभरात १० वनवासी संग्रहालये बांधण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती गृहमंत्री शाह यांनी दिली.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की, नक्षलवादी आणि त्यांची विचारधारा देशाच्या विकासाच्या आणि उज्ज्वल भविष्याच्या विरोधात आहे. ज्यांना नक्षलग्रस्त भागात मोबाईल टॉवर, रस्ते आणि इतर आवश्यक सुविधा व्हायला नको आहेत, ते तरुणांच्या उज्ज्वल भविष्याच्या मार्गात अडथळे निर्माण करत आहेत असे शाह म्हणाले. हिंसाचार नोकऱ्या देऊ शकत नाही आणि विकास आणि मूलभूत पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होणे आवश्यक आहे असे गृहमंत्री शाह म्हणाले.

देशातून नक्षलवादाचे उच्चाटन करण्यासाठी वनवासी युवकांनी महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे असे ते म्हणाले. स्वतः चुकीच्या मार्गावर न चालणे आणि इतरांना तसे करू न देणे ही वनवासी युवकांची जबाबदारी आहे असे गृहमंत्री म्हणाले. वनवासी युवकांनी आपापल्या घरी परत गेल्यावर सर्वांना सांगावे की आज देश प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे आणि आदिवासींसाठी प्रत्येक क्षेत्रात मुबलक संधी आहेत असेही गृहमंत्री अमित शाह म्हणाले.
Powered By Sangraha 9.0