महिलांच्या हाकेला धावणारी दुर्गा

19 Oct 2023 22:40:50
Suvarna Kadam

महिलांच्या न्याय व हक्कासाठी तत्परतेने धावून जाणारी दुर्गा म्हणून सुवर्णा कदम गेल्या १२ वर्षांपासून अविरतपणे कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याचा थोडक्यात घेतलेला धांडोळा...
 
पुण्यात नोकरीनिमित्ताने दाखल झालेल्या सुवर्णा कदम यांना शालेय जीवनापासून सामाजिक कामाची आवड. शाळेत ‘एनसीसी’मध्ये तसेच महाविद्यालयात विविध उपक्रमांत त्या अगदी हिरिरीने सहभागी होत. महाविद्यालय प्रतिनिधी, हिंदी साहित्य मंडळ यांसह विविध शैक्षणिक व साहित्य मंडळांच्या कार्यक्रमाचा भाग असल्याने आपसूक या वाचनाची आवड निर्माण झाली. पुढे नोकरी व शिक्षणामुळे सामाजिक कामापासून लांब राहिले. मात्र, आता ते पूर्ण झाल्याचा आनंद आहे. विशेष म्हणजे, नोकरी, कुटुंबाची जबाबादारी आणि कंपनी हे सर्व सांभाळून गरजूंना त्या न्याय मिळवून देत आहेत.सुवर्णा यांना २००४ साली नोकरीसाठी इतरत्र फिरावे लागल्याने महिलावर्गाच्या हालअपेष्टा आणि त्यांना सहन कराव्या लागणार्‍या अडचणी त्यांनी अगदी जवळून अनुभवल्या होत्या. त्यामुळे अशा गरजू महिलांसाठी काही तरी करण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. हिंजवडी येथे एका नामांकित कंपनीत नोकरीसाठी रुजू झाल्यानंतर सुवर्णा यांना थोडा वेळ मिळू लागला. मग कंपनीत सुटल्यानंतर तर कधी सुट्टीच्या दिवशी या कामासाठी वेळ देऊ लागले.

महिलांचे सक्षमीकरण, चांगले आरोग्य व विविध योजनांचा त्यांना लाभ मिळावा, यासाठी गावपातळीवर जनजागृती करण्यास सुवर्णाताईंनी सुरुवात केली. सुरुवातीला जवळच्या काही मित्रमंडळींसमवेत पुणे व परिसरातील विविध ठिकाणी भेट देऊन महिलांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. त्यात बांधकामस्थळी काम करणार्‍या महिला, वीटकामगार महिला, सफाई कर्मचारी तसेच झोपडपट्ट्यांमधील महिलांशी त्यांनी संवाद साधला. आतापर्यंत जवळपास दीडशेहून अधिक महिलांना विविध समस्यांतून त्यांनी बाहेर काढले. त्यात अनेक महिल्या या कौटुंबिक कारणे व आजारांनी ग्रासून ताणतणावाखाली जीवन कसेबसे जगत होत्या. त्यांना योग्य उपचार व समुपदेशन देण्यात आले. अनेकदा महिलांची फसवणूक होते. अनेकदा अबू्र जाईल किंवा आपण महिला म्हणून काहीच करू शकत नाही, या भावनेने त्या गप्प बसतात. त्यांना बोलते करून कधी राजकीय, तर कधी कायद्याच्या आधाराने सुवर्णाताईंनी मदत मिळवून दिली. पोलीस व महापालिका स्तरावर महिलांना न्याय मिळवून दिला.

या कामाच्या माध्यमातून पुढे ‘पी. डी. फाऊंडेशन’ या संस्थेशी त्या जोडल्या गेल्या. या संस्थेत काम केल्यानंतर महिलांच्या अनेक समस्या त्यांना जाणून घेता आल्या. संस्थेने उपाध्यक्षपदाची जबाबादारी दिल्यानंतर त्यांच्या कामाची व्याप्ती आणखीनच विस्तारत गेली. पोलीस ठाण्यातून ग्रामसुरक्षा रक्षक, दक्षता समिती व पोलीस मित्र म्हणून काम करण्यासाठी सुवर्णाताईंचे नाव सूचविले गेले. त्यातही वेगळ्या कामांतून त्यांनी आपला ठसा उमटवला. महिला सुधारगृह व वाममार्गाला वळलेल्या महिलांचे समुपदेशन करून त्यांना समाजात मानाचे स्थान देण्यासाठी सुवर्णाताईंनी प्रयत्न केले. तसेच वस्तीपातळीवर महिलांसाठी उद्योग-व्यवसाय उभारण्यासाठी सहकार्यदेखील केले. आजही अनेक महिला विविध समस्या व कामांसाठी सुवर्णाताईंना संपर्क करतात.

फाऊंडेशनच्या माध्यमातून अनाथ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, अन्नधान्य व कपडे पुरवणे, रस्त्यावर झोपलेले व बेघर व्यक्तींना जेवण देणे, ब्लँकेट देणे तसेच त्यांच्या आरोग्य काळजीसाठी त्यांच्यावर महापालिकेच्या सहकार्याने उपचार करून घेणे, दिव्यांग संस्था व विशेष मुलांसाठी आर्थिक मदत उभारणे, व्हिल चेअर वाटप करणे यांसारखी अनेक कामे आजही सुरु आहेत. मध्यंतरी कोरोनाच्या काळात विशेषतः झोपडपट्ट्यांमध्ये जनजागृती करण्याचे खूप मोठे काम पार पाडले. यावेळी अगदी जेवण देण्यापासून वैद्यकीय उपचारांसाठी २४ तास काम केल्याचे त्या सांगतात. या काळात काम करणारे सफाई कामगार व विविध सेवा देणार्‍या महिलांचा सत्कार करण्यात आला होता. रणरागिणींचे सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव केला. याच काळात रक्त कमी पडत असल्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस मित्र, सामाजिक कार्यकर्ते, महिला यांनी या शिबिरात सहभाग नोंदवला होता.

गरीब, गरजू व ज्येष्ठ महिलांसाठी रिक्षा, रुग्णवाहिका सेवादेखील सुरू करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील वाकड, जांबे, पुनावळे, मारुंजी या ठिकाणी राहणारे कामगार वर्ग, वीटभट्टीवर काम करणार्‍या महिलांच्या उपचारासाठी ही रिक्षा सेवा सुरू करण्यात आली. या माध्यमातून अनेक महिलांना योग्य व वेळेवर उपचादेखील मिळाले आहेत. सांगली येथील पूरग्रस्तांना मदत तसेच ईशाळवाडी या ठिकाणीदेखील मदत केली. औषधे, फळे, कपडे यांसह विविध वस्तू पुरविण्यात आल्या होत्या.वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी या उपक्रमाचे कौतुक केले होते. दरम्यान, हे सर्व काम करताना विविध पुरस्कारांनी सुवर्णाताईंना सन्मानित करण्यात आले. त्यात राज्यस्तरीय पुरस्कारासहित काही सामाजिक संस्थांकडून गौरविण्यात आले होते. “समाजासाठी आणखी बरेच काम करायचे आहे. आजही घरात वृद्ध नागरिक एकटे राहतात. त्यांची मुले लक्ष देत नाहीत. परिणामी, ते विविध उपचारांअभावी वंचित राहतात. या वर्गासाठी पुढे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी ज्येष्ठांचा मेळावा आणि माहिती गोळा करण्यात येणार आहे. तसेच, आपले विविध हिंदू सण आणि संस्कृती टिकावी यासाठी प्रत्येक सण समाजातील विविध वर्गांतील बांधवांना समवेत घेऊन साजरे करणार आहोत. कारण, आमचा महिलांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना सक्षम बनविणे, हा हेतू आहे,” असे सुवर्णाताई सांगतात. त्यांना पुढील प्रवासासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवारातर्फे शुभेच्छा.




-पंकज खोले

 
Powered By Sangraha 9.0