क्वेशन फॉर कॅश?

19 Oct 2023 21:54:11
Nishikant Dubey's allegations on Mahua Moitra


अदानी समूहाच्या कंपन्यांना निशाणा बनवत, बाजारात अस्थिरता आणणार्‍या, अमेरिकन शॉर्ट सेलर ‘हिंडेनबर्ग रिसर्च’च्या अहवालाची सखोल चौकशी करण्याची मागणी, मागे वकील हरीश साळवे यांनी केली होती. तेव्हा या मागणीविरोधात हरीश साळवे यांच्यावर तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्राने तर्कहीन टीका केली होती. अमेरिकन रिसर्च कंपनीच्या अहवालाची चौकशी व्हावी, या मागणीबद्दल मोईत्रा यांना इतका राग का यावा? असा प्रश्न अनेकांना पडला. पण, त्याचे संदर्भ आता कुठे लागत आहेत. झारखंडचे खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे. त्या पत्रात ते लिहितात की, ”महुआ मोईत्रा यांनी संसदेमध्ये ६१ प्रश्न विचारले. मात्र, त्यामध्ये ५० प्रश्न दर्शन हिरानंदानी यांच्या उद्योगाच्या लाभासाठीचे होते आणि ते अदानी समूहाला लक्ष्य करत विचारले गेले होते. पैसे आणि महागड्या भेटवस्तू घेऊन महुआ यांनी हे प्रश्न संसदेमध्ये विचारले आहेत. त्यामुळे महुआ यांची चौकशी व्हावी. महुआ यांनी विशेषाधिकाराचे हनन केले असून, सदनाचा अपमान केला आहे,” असा आरोपही निशिकांत यांनी केला. महुआ यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या ‘१२० अ’च्याअंतर्गत गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांना सदनामधून निलंबित करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली. महुआ यांनी प. बंगालमधील राजकीय आणि नैतिक हिंसा, धर्मांधांचा दहशतवाद, गरिबी, महिला बालतस्करी याबद्दल गांभीर्याने प्रश्न उपस्थित केले नाहीत. या पार्श्वभूमीवर ती घटना आठवते-संसदेमध्ये गरिबी, महागाईवर चर्चा सुरू असताना, महुआ लाखो रुपयांची पर्स घेऊन संसदेत आल्या. संसदेत गरिबीवर चर्चा सुरू असताना, आपण लाखो रुपायांची पर्स कशी वापरते, हा विरोधाभास लोक पकडतील, हा विचार करून त्यांनी ती पर्स पटकन आसनाखाली लपवली. किती धूर्तता!हिंदू देव, धर्म, श्रद्धा यांवर सातत्याने टीका करणार्‍या महुआ मोईत्रा यांनी कालिमातेबद्दल म्हटले होते की, “माझ्या मते, कालिमाता दारू पिते आणि मांसाहार करते.” नियतीचे कवित्व पाहा की, त्याच महुआंच्या कारकिर्दीवर गंभीर प्रश्न उपस्थित करत, त्यांच्या भ्रष्ट आचरणाबद्दल चौकशीची मागणी शारदीय नवरात्रोत्सव सुरू असताना होत आहे. कालिमाता काय खाते, काय पिते, यापेक्षा कालिमाता दुष्ट आणि भ्रष्ट विचार आचारांचे निर्दालन करते, हे नक्की!


नूरी ते पॅलेस्टाईन...



माझ्या विरोधात ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम)चे प्रदेश प्रवक्ता मोहम्मद फरहान न्यायालयात गेले आहेत. मम्मा, मी तुला कुत्र्याचे पिल्लू भेट म्हणून दिले, त्या पिल्लाचे नाव नूरी ठेवले आहे. मोहम्मद फरहान यांनी कुराणचा संदर्भ देत सांगितले की, नूरी नाव हे इस्लाममध्ये पवित्र आहे. कुत्र्याच्या पिल्लाचे नाव नूरी ठेवून मी मुस्लीम धर्मियांच्या भावना दुखावल्या, असे मोहम्मद फरहान म्हणत आहे. मम्मा, हेच फळ काय आपल्याला? मम्मा, आपण पॅलेस्टाईनला समर्थन दिले. आमचे पंतप्रधान मनमोहन सिंग होते, तेव्हा ते खुलेआम म्हणाले होते की, देशाच्या साधनसामग्रीवर पहिला हक्क अल्पसंख्यांकाचा आहे. म्हणजेच बहुसंख्य हिंदूंनी या साधनसामग्रीवर बिल्कूल हक्क सांगू नये. म्हणजेच देशाचा अल्पसंख्याक असलेला मोठा गटाचा त्यावर हक्क आहे, असे म्हणाले होते. इतकेच काय? त्यांनी खूश व्हावे म्हणून आपण रामसेतूवर अगदी रामजन्मभूमीवर देखील प्रश्न उपस्थित केला. रामजन्मभूमीविरोधात काय-काय केले, हे सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्रात त्या उद्धव ठाकरेंसोबत सत्तेत होतो, तेव्हा उर्दू भवन बांधण्यासाठी त्यांनी जो विडा उचलला होता, त्यापाठी आपला हातच होता. आपले काम महाराष्ट्रात ते चांगल्या प्रकारे करतात, हो ना गं मम्मा. हं! तर काय म्हणत होतो की, आपण आपल्या मुस्लीम भाईंसाठी काय-काय आणि किती केले. विसरलो बघ, नुकतेच कर्नाटकमध्ये आपण सत्तेत आलो. तेव्हा आपण तिकडे आपल्या मुस्लीम भावा-बहिणींसाठी किती जोमाने काम करत आहोत. महाराज सल्तनत टिपू सुलतानाचा इतिहास हा सर्वश्रेष्ठ असून, बाकी इतरांचा इतिहास काहीच नाही, असा अभ्यासक्रम करण्याचा प्रयत्नही केला आहे ना?त्यामुळे आता मी निश्चिंत होते. येणार्‍या निवडणुकीमध्ये तर आपली जित पक्की असे वाटले होते. पण, मध्येच हे काय झाले? मम्मा, पॅलेस्टाईनला ५७ मुस्लीम देशांचे समर्थन आहे ना? वाह वा! म्हणजे, आपल्याला ५७ देशांचे समर्थन मिळणार. ते मोदी तर इस्रायल-इस्रायल करतात. आता त्यांना एकही मुस्लीम मत मिळणार नाही. आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजी मारली. आपल्याला पण आता मुस्लीम देश पुरस्कार देतील ना? का म्हणजे, मोदींना कसे सगळे देश, त्यांचे सर्वोच्च सन्मान देतो. आता आपल्यालाही मुस्लीम देशांनी सन्मानित केले पाहिजे. पण, आता या नूरीचे काय करायचे?



Powered By Sangraha 9.0