पंतप्रधानांची सूचना आणि मंत्री लोढांनी घेतला तत्काळ निर्णय!

19 Oct 2023 20:09:15
Mangalprabhat Lodha On Soft Skill Centre

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सॉफ्ट स्किल सेंटर उभारणीच्या संदर्भात राज्य सरकारला सूचना केली होती. पंतप्रधानांच्या या सुचनेवर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी तात्काळ कारवाई करत घोषणा केली आहे. राज्यातील ६ महसूल विभागात ६ आंतरराष्ट्रीय सॉफ्ट स्कील सेंटर सुरु करण्याची घोषणा मंत्री लोढा यांनी केली आहे. सदरील निर्णयाची येत्या ३ महिन्यात अंमलबजावणी होणार असून विद्यार्थ्यांना परदेशात नोकरी मिळवण्यात केंद्राची मोठी मदत होणार आहे. परदेशी भाषा व इतर सॉफ्ट स्कीलचे प्रशिक्षण केंद्रातून दिले जाणार आहे.

राज्यातील ५११ प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि.१९ ऑक्टोबर रोजी दु.४ वाजता ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन झाले. “मन की बात” या कार्यक्रमाच्या धर्तीवर राज्यात एकाचवेळी ५४ ठिकाणी या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की,"भारताची आत्मा खेड्यांमध्ये राहते, त्यामुळे गावांना कौशल्य प्रशिक्षित केले तर गावे सशक्त करण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही."

पंतप्रधानांचे हस्ते होणारे प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे उदघाटन ही नव्या युगाची सुरुवात आहे. युवकांना आधुनिक शिक्षणासह कौशल्य प्रशिक्षण मिळाले तर कुणीही गाव सोडून शहरात येणार नाही. आमच्या सरकारने सत्तेत येताच गावात कौशल्य प्रशिक्षणाच्या नव्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. विश्वकर्मा योजनेसह महिलांसाठीच्या कोर्सेसना यात सहभागी करून घेण्यात आले आहे. पंतप्रधानांनी या कार्यक्रमाला हजर राहून आमची जबाबदारी कैक पटींनी वाढवली आहे. येत्या काळात राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत कौशल्य विकास केंद्र सुरु होणार असून त्यातून युवकांच्या उज्जवल भविष्याचा मार्ग खुला होणार आहे. कौशल्य प्रशिक्षण केंद्र युवकांच्या आशा अपेक्षांची केंद्र असून शिक्षण - कौशल्य प्रशिक्षणातून युवक देशाची प्रतिमा उंचावतील असा मला विश्वास आहे, असे विधान मंगलप्रभात लोढा यांनी केले.



Powered By Sangraha 9.0