अंबरनाथकर बिबट्याची ओळख पटणार का ?

18 Oct 2023 17:19:47
ambernath leopard


मुंबई (विशेष प्रतिनिधी): बदलापूरजवळील अंबरनाथ परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत आहे. बिबट्याच्या वावरावर वन विभागाचे लक्ष असून बिबट्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न वन विभागाकडून करण्यात येणार आहे.


सोमवार दि. ९ ऑक्टोबर रोजी अंबरनाथ शहरानजीक बिबट्याचे दर्शन झाल्याची प्राथमिक माहिती वनविभागाला मिळाली. शहराच्या वेशीवर असणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात बिबट्याचा वावर आढळून आला होता. तर, शुक्रवार दि. १३ ऑक्टोबर रोजी या बिबट्याने एका वासरावर हल्ला केल्याची माहिती वनाधिकाऱ्यांना मिळाली होती. जवळपास आठवड्याभरापासून बिबट्या परिसरात असल्याचे लक्षात आले आहे. मात्र, या बिबट्याने अद्याप एकही मानवी हल्ला केलेला नाही. मात्र, सावधानता राखून वन विभागाच्या सहकार्याने स्थानिक वनयजीव कार्यकर्ते सुहास पवार स्थानिकांमध्ये जनजागृतीचे काम करीत आहेत. बदलापूर, कल्याण, अंबरनाथ आणि उल्हासनगर या परिसरामध्ये वर्षातील काही ठराविक कालावधीमध्ये बिबट्यांचे दर्शन होत असते. २०१८ मध्ये उल्हासनगर परिसरातून नर बिबट्याचा बचाव करण्यात आला होता. त्यानंतर २०२२ मध्ये खर्डी आणि वाशिंदमधून देखील बिबट्यांचा बचाव करण्यात आला होता. २०२२ मध्येच कल्याण शहरात शिरलेल्या नर बिबट्याला भर वस्तीमधून पिंजराबंद करण्यात आले होते. मात्र, २०२२ मध्ये अहमदनगर येथून उल्हासनगर येथे स्थलांतरित झालेल्या बिबट्यामुळे हा संपूर्ण भाग वन्यजीव भ्रमणमार्गाचा भाग असल्याचे समोर आले होते.



२०२२ साली उल्हासननगर येथे वावरत असलेल्या बिबट्याच्या गळ्यात रेडिओ काॅलर असल्याचे आढळले होते. तपासाअंती या बिबट्याला 'भारतीय वन्यजीव संस्थान'ने (डब्लूआयआय) वन विभागाच्या सहकार्याने अहमदनगर येथे रेडिओ काॅलर लावल्याचे समोर आले होते. हा बिबट्या ८० किलोमीटर चालून उल्हासनगरमध्ये दाखल झाला होता. यावेळी त्याने उल्हास नदी आणि मुंबई-पुणे रेल्वेमार्गही ओलांडला होता. महिनाभर उल्हासनगरमध्ये वास्तव्य केल्यानंतर तो जुन्नर तालुक्यात स्थलांतरित झाला. त्यानंतर 'डब्लूआयआय'च्या संशोधकांनी त्याच्या गळ्यातील रेडिओ काॅलर काढली होती. आता अंबरनाथ परिसरात दिसत असणारा बिबट्या हा तोच बिबट्या असल्याची धारणा काही वनकर्मचाऱ्यांची आहे. त्यामुळे अंबरनाथ परिसरात दिसत असलेल्या बिबट्याची ओळख पटवणे आवश्यक असून त्यासाठीचे प्रयत्न वन विभागाकडून करण्यात येणार आहे.


संशोधन आवश्यक
मुंबईतील बिबट्यांच्या ज्या पद्धतीने शास्त्रीयरित्या अभ्यास झाला आहे. तसा अभ्यास अद्यापही अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण आणि बदलापूर या परिसरात वावरणाऱ्या बिबट्यांचा झालेला नाही. त्यामुळे येथील बिबट्यांच्या स्थलांतराचा आणि एकंदरीत अधिवासाचा अभ्यास होणे आवश्यक आहे. शिवाय या परिसरात वावरणाऱ्या बिबट्यांची ओळख पटवून त्यांचे एकत्रितरित्या संकलन करणे देखील गरजेचे आहे.

बदलापुर अंबरनाथ परिसरात बिबट्या आढळल्याचे लक्षात आल्यापासुन वनविभागाचा चमू या बिबट्यावर लक्ष ठेवण्यासाठी पेट्रोलिंग करत आहेत. तसेच, वनविभागाकडून जनजागृतीही केली जात आहे.” - विवेक नातू, वनपरिक्षेत्र अधिकारी, बदलापूर

 

Powered By Sangraha 9.0