लखनऊ : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या एका वक्तव्यामुळे इंडी आघाडीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. इंडी आघाडीचे मित्रपक्ष काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांच्यात मध्यप्रदेशातील जागांवरून मतभेद निर्माण झाले आहेत. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी काँग्रेसला थेट इशारा दिला आहे.
अखिलेश यादव म्हणाले की, " मध्य प्रदेश विधानसभा निवडणूकीत काँग्रेस सपाला जागा देण्यास तयार नसेल, तर यूपीमध्ये विधानसभेत सपा काँग्रेससोबत युती करणार नाही." सपा अध्यक्ष अखिलेश यादव मंगळवारी कानपूरमध्ये अखिल भारतीय यादव महासभेच्या कार्यक्रमात हे विधान केले.
यावेळी पत्रकारांनी त्यांना मध्य प्रदेशातील काँग्रेससोबत सुरु असलेल्या जागावाटपाच्या चर्चेवर प्रश्न विचारला असता अखिलेश यादव म्हणाले की,"काँग्रेसला सांगावे लागेल की इंडी आघाडी फक्त राष्ट्रीय पातळीवरील लोकसभा निवडणुकीसाठी आहे की विधानसभा निवडणुकांसाठी? आता विधानसभा निवडणुकीसाठी युती झाली नाही तर भविष्यातील यूपी विधानसभा निवडणुकीतही युती होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले."