आव्हाडांच्या मतदार संघात चाललेय काय ?

18 Oct 2023 19:26:12
NCP Naijb Mulla On Jitendra Awhad

ठाणे :
कळवा पूर्व येथील लोकांकडून स्थानिक लोकप्रतिनिधीचे १६ गुंड दर महिन्याला ३० ते ४० लाखाची खंडणी गोळा करतात, अशी माहिती पोलिसांनीच दिल्याचा भंडाफोड राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. तसेच येत्या शुक्रवारी कळवा पूर्वेकडील लोकांसाठी आव्हाडांनी हंडा मोर्चाचा फार्स ठेवला आहे. त्याची चिरफाडच एकप्रकारे मुल्ला यांनी केली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद पराजपे, प्रकाश बर्डे, युवक काँग्रेस अध्यक्ष विरु वाघमारे आदी उपस्थित होते.

गणेशोत्सव काळात कळवा पूर्व येथील नागरिकांनी पिण्याच्या पाण्याविषयी तक्रारी करून स्थानिक लोकप्रतिनिधींची लोक प्रत्येक कुटूंबाकडून बोअरवेलच्या पाण्यासाठी ५०० रुपये गोळा करीत असल्याची माहिती राष्ट्रवादीला दिली होती. याबाबत पोलिसांकडे शहनिशा केल्यानंतर पोलीसांच्या तपासात येथील स्थानिक लोकप्रतिनिधींचे १६ गुंड दर महिन्याला लोकांकडुन ३० ते ४० लाख रुपयांची खंडणी गोळा करत असल्याचे समोर आले होते. ही खंडणी वसूल करणार्‍यांची नावे व यामागील सूत्रधार लवकरच जाहीर करणार असल्याचे संकेत नजीब मुल्ला यांनी दिले.

पाणी प्रश्न सहा महिन्यात मार्गी लागणार

कळवा पूर्व येथील भास्कर नगर, पौंडपाडा, आतकोनेश्वर नगर येथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या तक्रारीनंतर राष्ट्रवादीच्या वतीने ठाणे महापालिका आयुक्तांकडे निवेदन दिले असून स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मदतीने केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत २४० कोटी रुपये पिण्याच्या पाण्यासाठी महापालिकेला देण्यात आले आहेत. त्यामुळे या अमृत योजनेतुन कळवा पूर्व येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सहा महिन्यात मार्गी लावणार असल्याचे मुल्ला यांनी सांगितले. दरम्यान, ही बाब आ. जितेंद्र आव्हाड यांना कळल्यानंतर गेली १४ वर्ष शांत बसलेले आव्हाड जागे झाले आणि शुक्रवारी पाण्यासाठी हंडा मोर्चा काढून श्रेयाचे राजकारण करत असल्याचा आरोप नजीब मुल्ला यांनी केला.

आव्हाड स्वतः कर्मकांडे करतात अन हिंदु धर्मावर टीकाही

जितेंद्रआव्हाड हे महाराष्ट्राला कायमच चुकीचा, अर्धवट, सोईचा आणि खोटा इतिहास सांगतात. आपल्या सोईचा इतिहास व आपल्या सोईचे धर्माचे विश्लेषण हे समीकरण म्हणजे जितेंद्र आव्हाड आहे, अशी खिल्ली जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत उडवली.एखाद्या धर्माबद्दल, जातीबद्दल चुकीचे बोलायचे, धार्मिक तसेच जातीय भावना भडकल्या जातील, असे वक्तव्य करायचे.

लिंगायत समाजविरोधी वक्तव्य करायचे, सनातन धर्मविरोधी वक्तव्य करायचे, धनगर समाजाबद्दल बोलायचे, सनातन हिंदू धर्माविरोधात बोलायचे हा जितेंद्र आव्हाड यांचा स्थायीभाव आहे. आव्हाड स्वतः पितृपक्षात शनि शिंगणापूरला जाऊन कर्मकांडे करतात आणि हिंदू धर्मावर टीकाही करतात. हे इंटरपिटीशन म्हणजे जितेंद्र आव्हाड आहे. अशी बोचरी टीका परांजपे यांनी केली.

Powered By Sangraha 9.0