पाकिस्तान आणि चिनी आगळिकीस उत्तर देण्यास भारतीय सैन्य सज्ज

18 Oct 2023 19:31:42
Defense Minister Rajnath Singh At Army Commanders Conference

नवी दिल्ली :
भारतीय सैन्य देशाच्या पश्चिम आणि उत्तर सीमेवरील कोणत्याही आगळिकीस उत्तर देण्यास सक्षम आहे, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आर्मी कमांडर्स परिषदेस संबोधित करताना केले.

देशाच्या सर्वात विश्वासार्ह आणि प्रेरणादायी संघटनांपैकी एक असलेल्या भारतीय लष्करावर संपूर्ण देशाच्या विश्वासाचा संरक्षणमंत्र्यांनी पुनरुच्चार केला. गरजेच्या वेळी नागरी प्रशासनाला मदत करण्याबरोबरच आपल्या सीमांचे रक्षण करणे आणि दहशतवादाविरुद्ध लढण्यात लष्कराची महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी अधोरेखित केली. त्यांनी आर्मी कमांडर्स कॉन्फरन्सच्या उपस्थितीबद्दल आनंद व्यक्त केला आणि माननीय पंतप्रधानांचे 'संरक्षण आणि सुरक्षा' दृष्टीकोन यशस्वीपणे पुढे नेल्याबद्दल लष्कराच्या नेतृत्वाचे कौतुक केले.

उत्तर सीमेवरील परिस्थितीबद्दल भाष्य करताना संरक्षणमंत्र्यांनी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी लष्करावर पूर्ण विश्वास व्यक्त केला. शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी सर्व पातळ्यांवर सुरू असलेली चर्चा सुरू राहील, असे ते म्हणाले. पश्चिम सीमेवरील परिस्थितीचा संदर्भ देऊन त्यांनी सीमेपलीकडून छद्म युद्ध सुरू असले तरी सीमेपलीकडील दहशतवादाविरुद्ध भारतीय लष्कराच्या दहशतवादविरोधी कारवायांचे कौतुक केले. जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादाचा सामना करण्यासाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दल/पोलीस दल आणि लष्कर यांच्यातील उत्कृष्ट समन्वयाचे त्यांनी कौतुक केले. जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशात समन्वित कारवाया या प्रदेशात स्थैर्य आणि शांतता वाढवण्यास हातभार लावत आहेत आणि ती चालू ठेवली पाहिजे, असेही संरक्षण मंत्र्यांनी नमूद केले.

हायब्रिड युद्धासाठी सज्ज होणे आवश्यक

सध्याच्या जटिल आणि कठीण जागतिक परिस्थितीबद्दल बोलताना संरक्षण मंत्री म्हणाले की, संकरित हायब्रिड युद्धासह अपारंपरिक आणि अनियंत्रित युद्ध भविष्यातील पारंपारिक युद्धांचा एक भाग असेल आणि हे जगाच्या विविध क्षेत्रांमध्ये होत असलेल्या संघर्षांमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. यासाठी सशस्त्र दलांनी रणनीती आणि योजना आखताना या सर्व बाबी लक्षात ठेवल्या पाहिजेत. वर्तमान आणि भूतकाळात घडलेल्या जागतिक घटनांमधून आपण शिकत राहिले पाहिजे. त्यासाठी भारतीय लष्कराने योजना, रणनीती आणि अनपेक्षित परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हावे, असेही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.
Powered By Sangraha 9.0