मुंबई : शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी शिवाजी पार्कवर घेण्यात येतो. मात्र, दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडली आणि दोन्ही गटाचे वेगवेगळे मेळावे होऊ लागले. गेल्या वर्षी ठाकरे गटाचा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा झाला. त्यावेळी शिवसेना कोणाची याचा निर्णय झाला नसल्याने ठाकरे गटाला मैदानावर मेळावा घेण्याची परवानगी देण्यात आली होती. यंदा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी देण्यात यावी यासाठी शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटाकडून दोन महिन्यांपूर्वीच महानगरपालिकेकडे अर्ज करण्यात आला होता. पण, नंतर शिंदे गटाकडून अर्ज मागे घेण्यात आला. त्यामुळे शिवाजी पार्कवर यंदाही ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार आहे.
दुसरीकडे, शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा कुठे पार पडणार याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं ठिकाण ठरलं आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा 'आझाद मैदान'वर होणार आहे. दसरा मेळावासाठी क्राॅस मैदान व आझाद मैदान ही मैदानं ठरवण्यात आली होती. मात्र शिवसेनेकडून आता आझाद मैदानावर दसरा मेळावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. क्राॅस मैदान यावरती क्रिकेटच्या मैदानांचे पिच आणि मैदानांवर नियोजन करण्यात अडचणी येत असल्याने आझाद मैदानवर शिवसेनेचा दसरा मेळावा घेतला जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.