मराठी कलाकारांना हिंदीत जास्त आदर मिळतो - प्रथमेश परब

16 Oct 2023 18:00:20

prathamesh parab 
 
रसिका शिंदे-पॉल
 
 
मुंबई : चित्रपटाला भाषेची मर्यादा नसते हे अलीकडे सकारात्मकरित्या दिसून येत आहे. अनेक मराठी भाषिक कलाकार हिंदी किंवा दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारताना दिसत आहेत. दिग्दर्शक रवी जाधव यांच्या ‘बालक पालक’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणारा अभिनेता प्रथमेश परब आजवर अनेक भूमिकांतून घराघरांत पोहोचला आहे. त्यानंतर पुन्हा कदा एका मराठमोळ्या दिग्दर्शकामुळे म्हणजेच निशिकांत कामत यांच्यामुळे ‘दृश्यम’ सारख्या मोठ्या चित्रपटाचा भाग झालेल्या प्रथमेशचा सिंगल हा आगामी मराठी चित्रपट २७ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्तानेच महाएमटीबीशी गप्पा मारताना हिंदीत मराठी कलाकारांना अधिक सन्मान मिळतो असे महत्वाचे विधान प्रथमेश परब याने केले.
काय म्हणाला प्रथमेश?
“हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्गज कलाकरांसोबत काम करत असताना मी एक महत्वाची गोष्ट शिकलो, ती म्हणजे तुम्ही मागे काय काम करुन ठेवलं आहे हे विसरुन नवीन काय काम करु शकता याकडे लक्ष दिले पाहिजे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे मराठीपेक्षा हिंदीत मराठी कलाकारांना जास्त सन्मान इतर कलाकारांकडून दिला जातो. मराठीत मिळत नाही असे नाही, पण मराठीत सहसा काय होतं, की सगळेच एका कुटुंबांचा भाग असल्यासारखे असतात. पण मराठी भाषिक कलाकारांना मान हा हिंदीत अधिक दिला जातो, असे प्रामाणिक मत देखील प्रथमेशने मांडले”.
आजकाल कोणी 'एकटं' असलं की, लोकांच्या भुवया लगेच उंचावतात. लग्न झालंय की नाही? सिंगल की कमिटेड? अशा प्रश्नांचा भडिमार सुरु होतो. आणि जर या दोन्ही प्रश्नांची उत्तर नकारार्थी, असतील तर विचारूच नका..!! अशा ‘सिंगल’ असलेल्यांच नेमकं काय होतं? त्यांना कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं? हे दाखवणारा ‘सिंगल’ हा धमाल मराठी चित्रपट २७ ऑक्टोबरला आपल्या भेटीला येतोय. या चित्रपटाचं एक आकर्षक पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालंयं. पोस्टर मध्ये एक लालचुटूक हृदय पहायला मिळतंय. ते कोणाचं आहे? त्याचं काय म्हणणं आहे ? हे जाणून घेण्यासाठी दिग्दर्शक चेतन चावडा आणि सागर पाठक यांचा ‘सिंगल’ हा चित्रपट आपल्याला पाहावा लागेल.
Powered By Sangraha 9.0