पक्षी जाय दिगंतरा...

16 Oct 2023 21:52:00
himalayan bird Migration

जगभरातील बरेचसे पक्षी एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणी स्थलांतर करतात, हे आपण जाणतोच. आपल्या भोवतालाच्या परिसराशी जुळवून घेण्यासाठी नैसर्गिकपणे घडणारी ही प्रक्रिया. जगभरातील लाखो पक्षी विविध हंगामांत स्थलांतर करतात. काही पक्षी प्रजननाच्या कालावधीत, तर काही ऋतूबदलानुसार स्थलांतराचा निर्णय घेतात. पक्षी स्थलांतराच्या या कालावधीमध्ये वातावरणात होणारे बदल आणि या बदलांचे परिसंस्थेतील इतर घटकांवर होणारे परिणाम, यांचेही सहसंबंध जोडलेले आहेत. त्यामुळे पक्षी स्थलांतरावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या अवलंबून असलेल्या प्रजातींनाही हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जावे लागते. तेव्हा, अलीकडच्या काळात हवामान बदलाचा परिणाम हा पक्षी स्थलांतराच्या कालावधीवर झाल्याचा निष्कर्षही संशोधनाअंती समोर आला आहे.

हिमालय प्रदेशातील पक्ष्यांच्या स्थलांतराचा गेले दशकभर सुरू असलेला अभ्यास आणि संशोधनाचा अहवाल नुकताच प्रकाशित झाला. त्यानिमित्ताने हवामान बदलाचा पक्ष्यांच्या स्थलांतरावर होणार्‍या परिणामांचा आढावा घेणे क्रमप्राप्त ठरावे.हिमालयाच्या बर्फाळ प्रदेशातील तब्बल ३०२ हिमालयीन पक्ष्यांच्या प्रजातींचा २०११ ते २०२२ या दहा वर्षांच्या काळात संशोधनात्मक अभ्यास केला. त्यासंबंधीचा अहवाल ‘ग्लोबल इकोलॉजी अ‍ॅण्ड बायोजिओग्राफी’ या नियतकालिकामध्ये नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. हिमालयातील बहुसंख्य पक्षी हिवाळ्यात उताराकडील भागात म्हणजेच कमी उंचीच्या भागाकडे स्थलांतर करतात, तर फारच कमी अशा प्रजाती आहेत, ज्या कमी उंचीवरून जास्त उंची असलेल्या भागात स्थलांतर करतात. पक्षी स्थलांतराच्या अनेक कारणांपैकी काही कारणे म्हणजे, खाद्यान्न आणि निवार्‍याची उपलब्धता, प्रजननाचा कालावधी, ऋतूबदलामुळे होणारा तापमान बदल इत्यादी. हिवाळ्यात तापमानाचा पारा खाली घसरत असल्यामुळे कडाक्याची थंडी पडते. त्यामुळे हिवाळ्यातील अन्न आणि निवार्‍याची गैरसोय टाळण्यासाठी हे पक्षी मोठ्या प्रमाणात स्थलांतर करतात. तुलनेने अधिक तापमान असलेल्या पर्वतांखालील भागात हे पक्षी आश्रयाला येतात. अशाप्रकारे स्थलांतर करणार्‍या ६५ टक्के प्रजातींमध्ये विविध स्तरावरील बदल दिसून आले आहेत.

संशोधकांच्या मते, पक्ष्यांमधील हे बदल हवामान बदलांमुळे उद्भवले आहेत. हिमालयातील उंचावर प्रजनन करणार्‍या पक्ष्यांच्या प्रजाती आता संपूर्ण हिवाळ्याचा हंगाम त्याच ठिकाणी वास्तव्यास नसतात, असेही या संशोधन अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अहवालामध्ये बहुसंख्य पक्ष्यांनी हिवाळ्याच्या काळात कमी उंचीच्या भागात स्थलांतर केले असून, सरासरी केवळ दहा टक्के पक्ष्यांनी चढ किंवा उतार दर्शविला आहे. इतर ३५ टक्के प्रजातींनी उंचीच्या स्थलांतरामध्ये कोणताही बदल दर्शवलेला नाही. पश्चिम हिमालयातील २२१ पक्ष्यांच्या प्रजातींपैकी ५७ टक्के प्रजातींनी उताराचा बदल दर्शविला, तर पाच टक्के प्रजातींनी वरचा उतार दर्शविला आणि सुमारे ३८ टक्के प्रजातींनी उंचावरील शिफ्टमध्ये कोणतेही बदल दर्शविलेले नाहीत. पूर्व हिमालयाकडे लक्ष दिले असता, फळे खाणार्‍या पक्ष्यांच्या प्रजातींनी तुलनेने अधिक स्थलांतराचा टप्पा पार केला आहे, तर मांसाहारी पक्ष्यांनीही कमी उंचीच्या भागात खालच्या दिशेने पण तुलनेने कमी अंतराचा प्रवास केला आहे.

कॅनडाचे उदाहरण घेतल्यास या देशातील एक तृतीयांशपेक्षा जास्त पक्षी स्थलांतर करतात. कॅनडातील अतिशीत तापमानापासून बचावासाठी ते स्थलांतर करतात आणि हवामान किंवा ऋतूबदल झाला की मायदेशी परततात. वातावरणीय बदलांवर या पक्ष्यांचे स्थलांतर अवलंबून असल्यामुळे तापमानवाढीमुळे अर्थातच त्यांच्या स्थलांतर साखळीमध्ये बदल पाहायला मिळतात. स्थलांतराचा कालावधी आणि पक्ष्यांच्या वर्तनातील बदलांमागे तशी अनेकविध कारणे आहेत. म्हणून केवळ जागतिक तापमानवाढीमुळे पक्ष्यांच्या स्थलांतरावर शिक्कामोर्तब करता येत नाही, असे काही अभ्यासकांचे म्हणणे. ते काहीही असले तरी हिमालयातील पक्षी प्रजातींच्या स्थलांतरावरील परिणामांच्या नेमक्या कारणांचा संशोधक शोध घेत आहेत. तापमानवाढीचे केवळ पक्षीजगतावरच नाही, तर अखंड जीवसृष्टीवर परिणाम दिसून येतात. त्यामुळे हवामान बदलाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधणारा हा आणखी एक मुद्दा समजून, घेऊन, त्यावर काम करण्याची आज नितांत गरज यानिमित्ताने अधोरेखित व्हावी.



Powered By Sangraha 9.0