मदुराई : भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोने चांद्रयान-3 मोहीम यशस्वी केल्यानंतर विविध मोहीमा हाती घेतल्या आहेत. त्यातील गगनयान मोहीम अंतिम टप्प्यात आली असून येत्या काळात मानवयुक्त आणि मानवरहीत मोहीम राबविण्यासाठी इस्त्रोत लगबग सुरु आहे. इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी येथे माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, २१ ऑक्टोबर रोजी गगनयान मोहिमेचे पहिले चाचणी उड्डाण होणार आहे.
’गगनयान’ मध्ये, ३ सदस्यांची टीम ३ दिवसांच्या मोहिमेसाठी पृथ्वीच्या ४०० किमी वरच्या कक्षेत पाठवली जाईल. यानंतर क्रू मॉड्युल समुद्रात सुरक्षितपणे उतरवले जाईल. जर भारत आपल्या या मोहिमेत यशस्वी झाला तर असे करणारा तो चौथा देश ठरेल. याआधी अमेरिका, चीन आणि रशियाने हे केले आहे.
‘नासा’ला हवे चांद्रयान-3 चे तंत्रज्ञान
चांद्रयान-3 मोहिमेत इस्त्रोने यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग केले. यामुळे भारावून गेलेल्या अमेरिकेची अंराळ संशोधन संस्थेने चांद्रयान-3चे तंत्रज्ञान भारताकडून मागवले आहे. नासाचे काही तज्ज्ञ इस्रोच्या मुख्यालयात २३ ऑगस्ट रोजी आले होते. त्यांनी चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग कसे करेल हे आम्ही त्यांना समजावून सांगितले होते, अशी माहिती इस्त्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी दिली.