पीएम स्वनिधी योजना - फेरीवाल्यांना कर्ज वितरणाच्या लक्ष्यपूर्तीचे वेध

15 Oct 2023 18:28:29
PM Self Nidhi Yojana TMC

ठाणे :
केंद्र सरकारच्या पीएम स्वनिधी योजनेच्या लक्ष्यपूर्तीसाठी येणारा आठवडा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या सहकार्याने पीएम स्वनिधी योजनेत फेरीवाल्यांना सर्व बँकांनी विना विलंब कर्ज वितरण करावे, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रासाठी फेरीवाल्यांकरता असलेल्या पीएम स्वनिधी योजनेचे ३६८३० जणांना कर्ज वितरण करण्याचे सुधारित उद्दिष्ट देण्यात आले आहे. आतापर्यंत २६५८२ एवढे म्हणजे ७२.१७ टक्के उद्दिष्ट गाठलेले आहे. येत्या आठ दिवसांत आणखी १०२४८ जणांना कर्ज वितरीत करायचे आहे. याचा आढावा घेण्यासाठी आयुक्त बांगर यांनी महापालिका क्षेत्रातील राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका आणि सहकारी बँका यांच्या प्रतिनिधींची बैठक गेल्या आठवड्यात घेतली.

कर्ज वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पुढील एक आठवड्याचा कालावधी महत्त्वाचा आहे. त्यामुळे कर्जासाठी मंजुरी देणे, कर्जाचे वितरण करणे ही कामे जलद गतीने केली जावीत. त्यात येणाऱ्या अडचणीचा दैंनदिन स्वरूपात आढावा घेऊन ते अर्ज निकाली काढावेत असे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले. कर्ज मंजूर झाले पण वितरीत झाले नाही, तसेच, कर्ज मंजूर झाले पण ती व्यक्ती पुढील कार्यवाहीसाठी आली नाही, अशा स्वरूपाच्या अडचणींबाबत सर्व सहायक आयुक्त यांनी बँक आणि समाज विकास विभाग यांच्याशी समन्वय ठेवावा, असेही आयुक्त बांगर यांनी नमूद केले.

बँकनिहाय प्रलंबित अर्जांचा जिल्हा अग्रणी बँकेने सातत्याने पाठपुरावा करावा. या कर्ज वितरणासाठी केंद्र सरकारने निश्चित केलेल्या अटी व कागदपत्रे यांच्या शिवाय इतर कसलीही पूर्तता करण्यास अर्जदाराला बाध्य करू नये. तसेच, समाज विकास विभागाने प्रत्येक बँकेसाठी एकेक नोडल अधिकारी द्यावा, असेही आयुक्त बांगर म्हणाले. बँकांकडून काही जादा कागदपत्रे किंवा इतर गोष्टींची पूर्तता करण्याचा आग्रह धरला जात असेल तर त्याची नोंद घेऊन तसे पत्र जिल्हा अग्रणी बँकेला तत्काळ पाठवावे, असेही आयुक्त बांगर यांनी सांगितले.

महापालिका मुख्यालयात झालेल्या या बैठकीस समाज विकास विभागाच्या उपायुक्त वर्षा दीक्षित, जिल्हा अग्रणी बँकेचे नागेंद्र मंचाळ, पीएम स्वनिधी योजनेच्या राज्य सरकारच्या सल्लागार ऋचा तवकर, एसबीआयचे विभागीय व्यवस्थापक पंकज पाठक, बँक ऑफ महाराष्ट्रच्या सहमहाव्यवस्थापक संजू कुमारी तसेच ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध बँकांच्या शाखांचे ६५ व्यवस्थापक, सर्व सहायक आयुक्त, महापालिकेच्या समाजविकास विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0