मुंबई : देशी खेळ जपले जावे त्याचबरोबर देशी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात 'छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रिडा महोत्सवा चे आयोजन केले जाणार असल्याची माहिती कौशल्य, नाविन्यता, उद्योजकता आणि पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. देशी क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या मंत्रालयात आयोजित बैठकीदरम्यान ते बोलत होते.
दरम्यान, येत्या डिसेंबर महिन्यात मुंबई उपनगर जिल्ह्यात 'छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रिडा महोत्सवा चे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच, आपले विविध देशी क्रीडा प्रकार लुप्त होऊ नयेत याकरिता वेळोवेळी मागणी केली जाते. ही मागणी पाहता, खो-खो, कबड्डी, पावनखिंड दौड, रस्सीखेच इ. क्रीडाप्रकारांचा समावेश करून १५ दिवसांकरिता या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
देशी मैदानी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्याबाबत मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत देशी खेळांना प्रोत्साहन मिळावे तसेच पारंपारिक क्रिडा प्रकार जपले जावेत यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात क्रीडा भारतीमार्फत 'छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रिडा महोत्सव' आयोजित केला जाणार आहे. महोत्सवाचे नियोजन देशी मैदानी क्रीडा संघटनांनी समन्वय साधून काटेकोरपणे करावे,असे निर्देश देण्यात आले आहेत.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी वर्षा साळवी, मालाडाचे उपजिल्हाधिकारी धनाजी तोरस्कर, उपजिल्हाधिकारी संदीप निचीत, क्रीडा भारतीचे मंत्री श्रीकांत धर्माधिकारी, क्रिडा भारती कोंकण प्रांत उपाध्यक्ष डॉ. उत्तम केंद्रे, सदस्य गणेश विचारे तसेच विविध देशी मैदानी क्रीडा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.