“... आणि मी शाळेत उपोषणाला बसायचो”, सुबोधने सांगितला शाळेतला किस्सा

13 Oct 2023 18:45:12

subodh bhave
 
रसिका शिंदे-पॉल
 
मुंबई : पुण्यातल्या एका आयटी कंपनीत नोकरी ते अभिनयाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचलेला हरहुन्नरी अभिनेता सुबोध भावे हा शाळेत अतिशय मस्तीखोर मुलगा होता याची कबूली त्याने स्वत:च दिली आहे. 'साजिनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ' या त्याच्या आगामी हिंदी चित्रपटाच्या निमित्ताने ‘महाएमटीबी’शी संवाद साधताना सुबोध म्हणाला की, “आत्ता तुम्हाला दिसणारा मी आणि शाळेतला मी या दोन्ही वेगळ्या व्यक्ती होत्या. कारण शाळेत मी प्रचंड मस्तीखोर होतो आणि त्याचमुळे शाळेतल्या प्रत्येक शिक्षकाचा मी मार खाल्ला आहे”. 'बालगंधर्व', 'कट्यार काळजात घुसली', 'पुष्पक विमान', '... आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' अशा अनेक मराठी चित्रपटांत सुबोधने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.
 
“शाळेतल्या प्रत्येक शिक्षकाचा मी बेदम मार खाल्लाय..”, सुबोधने दिली कबूली
 
“माझ्याकडे आता जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला असलं वाटेल की शाळेत मी फार शिस्तप्रिया किंवा गंभीर विद्यार्थी होतो. तर असं काहीच नाही आहे. आत्ताचा सुबोध आणि शाळेतला सुबोध ही दोन्ही व्यक्तिमत्व फारच निराळी होती. शाळेतल्या एकूणएक शिक्षकाचा मी मार खाल्ला आहे. पहिली ते दहावी इयत्तेत प्रत्येक शिक्षकांनी मला बेदम मारले आहे. आयुष्यातील सगळी मस्ती, खोडकरपणा माझा शाळेत करुन झाला आहे. त्यामुळे आता माझं एक नवीन आयुष्य सुरु झालं आहे. शाळेतल्या कोणत्याही गोष्टी जर का पटल्या नाही तर संपुर्ण वर्गाला गोळा करुन मी वर्गाबाहेर उपोषणाला बसतात तसे आम्ही सर्व विद्यार्थी बसायचो. शाळेत अभ्यास तर केलाच पण त्याव्यतिरिक्त खेळ, गॅदरिंग मध्येही तितकात उत्साहाने सहभागी असयाचो. वर्गाचा मी मॉनिटर होतो. पण आता ज्या शिक्षकांनी मला शिक्षा केली ते सर्व शिक्षक आता भेटले की माझं कौतुक त्याहून अधिक करतात याचा आनंद मला अधिक होतो”.
 
'साजिनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ' या चित्रपटात अभिनेत्री भाग्यश्री, राधिका मदान, निमरत कौर यांच्यासह अभिनेता चिन्मय मांडलेकर, सुबोध भावे, शशांक शिंदे, सुमित व्यास असे मातब्बर कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट २७ ऑक्टोबर, २०२३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0