लखनऊ : उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील एका मशिदीच्या मौलानाविरुद्ध तिरंग्याचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद अयुब असे आरोपी मौलानाचे नाव आहे. मौलाना अयुब यांनी मशिदीवरील तिरंगा ध्वजावर इस्लामिक ध्वज लावल्याचा आरोप आहे. मौलानाच्या कृत्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
पोलीसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. ही घटना गुरुवारी (१२ ऑक्टोबर २०२३) घडली. हिंदू संघटनांनी मौलानाअयुबवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हे प्रकरण बरेलीच्या हाफिजगंजमधील आहे. याप्रकरणी स्थानिक रहिवासी उदित शर्मा यांनी पोलिसांत तक्रार केली आहे.
उदित शर्मा यांनी सांगितले की, गुरुवारी ते काही कामासाठी बरेलीला जात होते. वाटेत रिठोरा इंद्रनगर हे गाव येते. उदित जेव्हा रिठोराला पोहोचला तेव्हा त्यांना रस्त्याच्या कडेला एक मशीद दिसली. या मशिदीवर खाली राष्ट्रध्वज तिरंगा दिसत होता. तिरंग्याच्या वर हिरवा इस्लामी ध्वज फडकत होता. उदित यांनी त्याचे फोटो काढले. नंतर हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.
आरोपी मौलाना हा बरेलीच्या नवाबगंज पोलीस स्टेशन परिसरात राहणारा आहे. त्याच्या वडिलांचे नाव शाहरुख आहे. ही बाब समोर येताच हिंदू संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. बरेलीतील हिंदू जागरण मंचने मौलाना अयुबवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.