विधिमंडळ समिती नियुक्त्या रखडल्या

13 Oct 2023 16:31:12
vidhansabha

मुंबई :
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या विविध समित्यांवरील होऊ घातलेल्या नियुक्त्या पुन्हा एकदा रखडल्या आहेत. परवा झालेल्या भाजपा शिवसेना राष्ट्रवादी या तीनही पक्षांच्या समन्वय बैठकीनंतर नियुक्त्यांबाबत निर्णय झाला असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने नावे न दिल्याने पुन्हा एकदा विधिमंडळ समितीच्या नियुक्त्या रखडल्या आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

मंगळवार, दि. १० ऑक्टोबर रोजी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत विधिमंडळ समित्यांबाबत फॉर्म्युला देखील निश्चित करण्यात आला होता. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सत्तेतील तीन पक्ष असलेल्या भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये ५०:२५:२५ या प्रमाणात २८ समित्यांचे वाटप निश्चित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने भाजप आणि शिवसेनेच्या सदस्यांची नावे विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या उपसभापतींकडे सुपूर्द करण्यात आली होती. परंतु, महायुतीच्या तीन पक्षांपैकी राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या सदस्यांची नावे पाठवली नसल्याने हा मुद्दा रखडल्याचे समोर आले आहे.
 
Powered By Sangraha 9.0