नाचणारा बेडूक संकटात?

12 Oct 2023 21:01:43


dancing frog threatened species



जैवविविधतेने समृद्ध आणि संपन्न पश्चिम घाटामध्ये अनेक दुर्मीळ तसेच प्रदेशनिष्ठ प्रजाती आढळतात. बेडकांच्या गटातील ‘कोट्टीगेहर’ हा नाचणारा बेडूक पश्चिम घाटातील एक प्रदेशनिष्ठ प्रजात. ’Micrixalidae’ या कुळातील ही बेडकाची प्रजाती असून, त्याला सामान्यपणे ‘डान्सिंग फ्रॉग’ किंवा ‘नाचणारा बेडूक’ म्हणूनही संबोधले जाते. मात्र, या बेडकांची संख्या जागतिक स्तरावर आता कमी होत चालली आहे.


काही लाख वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असलेली बेडकांची ही प्रजाती ‘इव्होल्युश्नरी डिस्टिंक्ट अ‍ॅण्ड ग्लोबली इण्डेजर्ड’ अशा गटात मोडते. म्हणजेच ही प्रजाती नामशेष झाली, तर यांचे कूळच नष्ट होण्याचा धोका. जागतिक स्तरावर या बेडकांची संख्या कमी होण्याची अनेक कारणे आहेत. जगभरात असलेल्या उभयचरांच्या प्रकारातील, ही सर्वाधिक धोक्यात असलेली प्रजाती असल्याचे जागतिक उभयचर मूल्यांकनाच्या (Global Amphibian Assessment) अहवालातून समोर आले आहे.


हा बेडूक आपला एक पाय वर करून हवेत नाचताना दिसतो, म्हणून त्याला ‘नाचणारा बेडूक’ असे ओळखले जाते. प्रामुख्याने प्रवाही खडकांवर आढळणारी, ही बेडकाची प्रजाती प्रजननाच्या काळात मादी बेडकाला आकर्षित करण्यासाठी ही क्रिया करीत असते. जलस्रोतांवर वास्तव्यास असलेल्या, या प्रजातीचा आवाज पाण्याच्या प्रवाहामुळे फारसा ऐकण्यात येत नाही. त्यामुळे निसर्गतः मागच्या पायांच्या साहाय्याने नाचण्यासारखी क्रिया ते करतात. या कृतीला ‘फूट फ्लॅगिंग’ असेही म्हणतात.


’Micrixalidae’ किंवा ’Micrixalus’ कुळात बेडकांच्या एकूण २४ प्रजाती आढळत असून, त्यापैकी दोन गंभीरपणे धोक्यात, तर १५ प्रजाती नामशेष झालेल्या आहेत. जागतिक स्तरावरसुद्धा हीच अवस्था. जगातील उभयचरांच्या संख्येचा विचार करता, ४१ टक्क्यांहून अधिक उभयचरांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, तर ‘नाचणारा बेडूक’ ही अशी एक प्रजाती आहे, ज्यामधील ९२ टक्के बेडूक हे धोक्यात आले आहेत. त्यामुळे सर्वाधिक धोक्यात असलेली ही जगातील पाचवी प्रजाती ठरली आहे.
काही महिन्यांपूर्वी या बेडकांमध्ये एक डोळा नसलेला किंवा दिव्यांग बेडकांचा जन्म झाल्याचेही निदर्शनास आले होते. ‘कोट्टीगेहर’ या नाचणार्‍या बेडकांमध्ये हे दिव्यांगत्व मानववंशजन्य कारणांमुळे असल्याचे सांगितले जाते. ‘कोट्टीगेहर’ नाचणार्‍या बेडकांचा सर्वप्रथम शोध उभयचर जीवशास्त्रज्ञ सत्यभामा दास बिजू यांनी लावला. ‘फ्रॉगमॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या सत्यभामा यांनी २०१४ मध्ये केलेल्या संशोधनात १४ नाचणार्‍या बेडकांच्या प्रजातींचा शोध लावला होता. याच बेडकांच्या प्रजातींमध्ये दिव्यांगत्व आढळू लागल्यावर नाचणारा बेडूक यापुढे नाचणार की नाही, अशी चिंता संशोधक आणि अभ्यासकांनी व्यक्त केली होती.


’ATREE’ म्हणजेच ‘अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकोलॉजी अ‍ॅण्ड एनव्हायर्नमेंट’ या संस्थेतील संशोधक मधुश्री कुडके यांनी या बेडकांच्या नामशेष होण्यावर चिंता व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की, “किमान ७०-८० टक्के दाट वृक्ष असलेल्या भागात, ही प्रजाती अधिवास करीत असल्याचे आढळते. तसेच या प्रजातीच्या जवळपास जाणारी इतर कोणतीही प्रजाती आपल्याकडे नाही. त्यामुळे ही प्रजाती नामशेष झाल्यावर आपल्याबरोबर लाखो वर्षांचा उत्क्रांतिवाद घेऊन जाईल,” असे त्या म्हणतात.


कालानुरुप जमिनीच्या वापरात झालेले बदल, तापमान, आर्द्रतेतील फरक, पूर, अतिवृष्टी, संसर्गजन्य आजार, जलप्रदूषण अशा अनेक कारणांमुळे या प्रजातीला धोका निर्माण झाला आहे. अन्नसाखळीत महत्त्वाची भूमिका बजावणारे बेडूक परिसंस्थेत इतर पर्यावरणीय सेवाही देतात. परिसंस्थेत असलेल्या घटकांचे महत्त्व आणि काम समजून घेऊन त्यांच्या संवर्धन प्रयत्नांची गरजच यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. उभयचरांची घटत चाललेली संख्या आणि नामशेष होण्याच्या धोक्यांना लक्षात घेत, संवर्धनात्मक उपक्रम सुरू झाले असले तरी सामान्य नागरिकांनीही आपल्यापरीने होणारे पर्यावरणाचे नुकसान कमी करण्यासाठी प्रयत्नशील राहणे हीच वसुंधरेची हरितसेवा ठरेल!




Powered By Sangraha 9.0