इस्त्रायलमध्ये नरसंहार! शिरच्छेद केलेल्या अवस्थेत आढळले ४० बालकांचे शव
12 Oct 2023 12:16:25
मुंबई : इस्त्रायल आणि हमासमधील युद्ध दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होत आहे. या युद्धात दररोज असंख्य निष्पापांचा बळी जाताना दिसत आहे. यातच आता दक्षिण इस्रायलमधील केफर अझातील किबुत्झमध्ये लहान मुलांचे आणि ननजात बालकांचे शिरच्छेद केलेले मृतदेह सापडले आहेत.
इस्त्रायली सुरक्षा दल या भागात पोहोचले त्यावेळी त्यांना जवळपास ४० मुलांचे विकृत अवस्थेतील मृतदेह आढळले. हे वृत्त हमासने फेटाळले होते. परंतु, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे प्रवक्ते ताल हेनरिक यांनी याला दुजोरा दिला आहे. इस्त्रायली सुरक्षा दलाने या बालकांचे मृतदेह ताब्यात घेतले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही इस्रायलमधील या नरसंहाराचा उल्लेख केला आहे. ते म्हणाले की, मलाही अशा क्रूरतेची अपेक्षा नव्हती. मात्र हमासच्या दहशतवाद्यांनी लहान मुलांनादेखील सोडले नाही आणि त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. जो बायडेन व्हाईट हाऊसमध्ये ज्यूंना संबोधित करत होते.
दरम्यान, ७ ऑक्टोबर रोजी पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने इस्त्रायलवर केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत १२०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच इस्त्रायलने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गाझावरील हल्ल्यात १००० हून अधिक दहशतवादी ठार झाले आहेत.