डोंबिवली : डोंबिवलीत काही दिवसांपूर्वी दोन धोकादायक इमारतीचा भाग कोसळल्याने या इमारतीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला आला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कडोंमपा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. अशा संभाव्य घटना टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने एका विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. कडोंमपा आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे यांनी याबाबत लेखी आदेश दिले आहेत.
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत शेकडो इमारती धोकादायक आणि अतिधोकादायक इमारती आहेत. या इमारतीपैकी काही इमारती रिकाम्या केल्या आहेत. मात्र काही इमारतींमध्ये आज ही अनेक जण भिंतीच्या छायेखाली राहत असल्याचे दिसून येत आहे. डोंबिवलीत काही दिवसांपूर्वी लागोपाठ दोन धोकादायक इमारत कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. या घटना लक्षात घेता आयुक्तांनी खबरदारीचा उपाय म्हणून विशेष पथक स्थापन केले आहे.
या पथकात कोण असणार?
जुन्या धोकादायक आणि अतिधोकादायक इमारती कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी महापालिका आयुक्त यांच्या निदर्शनुसार आता महापालिकेच्या सर्व प्रभागात बांधकाम उपअभियंता, नगररचना विभागाचा सर्व्हेअर, मालमत्ता विभागाचा भाग लिपिक आणि अग्निशमन विभागाचा स्थानक/उपस्थानक अधिकारी यांचा अंतर्भाव या विशेष पथकात असणार आहे.
या पथकाचे काम कसे चालणार?
महापालिका परिक्षेत्रातील इमारती प्रथमदर्शनी अतिधोकादायक आहेत किंवा नाहीत हे निश्चित करण्यासाठी तांत्रिक ज्ञान व कौशल्याची आवश्यकता असल्यामुळे प्रत्येक प्रभागनिहाय, संबंधित प्रभागातील अतिधोकादायक इमारतींचे सर्व्हेक्षण करुन हे पथक अहवाल सादर करणार. पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पथकाने तात्काळ कामकाजास सुरुवात करुन आपला एकत्रित अहवाल मुख्यालयात सादर करणेबाबत आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी दिले आहेत. या विशेष पथकाने दैनंदिन कामकाजाचा अहवाल त्याचदिवशी निदर्शनास आलेल्या अतिधोकादायक इमारतींच्या यादीसह संबंधित प्रभागाचे सहाय्यक आयुक्त यांना रोज सायंकाळी पाठवायचा आहे. संबंधित प्रभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी पथकाकडून माहिती प्राप्त होताच नियमातील तरतुदीनुसार पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश ही आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे यांनी दिले आहेत.