कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सफाई कर्मचारी आयोग कार्यरत : मंत्री मंगलप्रभात लोढा

01 Oct 2023 17:50:28
Maharashtra Cabinet Minster Mangalprabhat Lodha

मुंबई : ``महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याकरिता अधिक जोमाने काम करेल व त्याव्दारे सफाई कामगारांचे हक्क व अधिकार त्यांना मिळतील, याची शासन खात्री करेल``, अशी ग्वाही कौशल्य विकास, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, मुंबई विद्यापीठ व जनआधार सेवा फाऊंडेशन, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय सफाई कामगार उत्थान परिषद मुंबई विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात आयोजित केली होती.

लोढा पुढे म्हणाले, “राज्य शासनाच्या विविध विभागाच्या वतीने सफाई कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या स्वयंरोजगाराच्या योजना, अनुकंपा वारसांना नोकरी देणे, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ व महाप्रित कंपनीच्या योजना, `नमस्ते` मोहीम, हाताने मैला उचलणाऱ्या कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध व त्यांचे पुनर्वसन करणे या अधिनियमानुसार कामगारांना आधुनिक यंत्रसामुग्री पुरविणे या आयोगामार्फत होऊ शकते. तसेच सफाई कामगारांच्या घरांचा प्रश्न तातडीने सोडविण्यात येईल.”, असेही मंत्री लोढा यावेळी म्हणाले.

यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. डी. कुलकर्णी, माजी अप्पर मुख्य सचिव ए. के. जैन, अखिल भारतीय वाल्मिकी महासंघाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. रेखा बहनवाल, सफाई मजदूर कॉंग्रेसचे राष्ट्रीय महामंत्री धनराज बिरदा, सल्लागार ऍड. गीरेंद्रनाथ, जनआधार सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय कांबळे उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडले.


Powered By Sangraha 9.0