मुंबई अर्थव्यवस्थेची भूमी तर उत्तर प्रदेश देशाची धर्मभूमी; योगी आदित्यनाथ यांचे गौरवोद्गार

06 Jan 2023 19:54:45


मुंबई अर्थव्यवस्थेची भूमी तर उत्तर प्रदेश देशाची धर्मभूमी; योगी आदित्यनाथ यांचे गौरवोद्गार

मुंबई : “मुंबई ही मुंबईच आहे. ही देशाच्या अर्थव्यवस्थेची भूमी आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, तर उत्तर प्रदेश देशाची धर्मभूमी आहे. भारताची धार्मिक राजधानी आहे,” असे गौरवोद्गार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी मुंबई दौर्‍यात काढले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबईतल्या उद्योग क्षेत्रातील दिग्गजांचीही त्यांनी भेट घेतली. सिनेजगतातील लोकांचीही त्यांनी भेट घेऊन नोएडामध्ये उभारल्या जाणार्‍या ‘फिल्मसिटी’बाबत चर्चा केली.
‘फिल्म इंडस्ट्री’ उत्तर प्रदेशात घेऊन जाणार असल्याच्या मुद्द्यावरून योगी आदित्यनाथ यांनी आपल्या खास शैलीत उत्तर देत मुंबई ‘फिल्मसिटी’ उत्तर प्रदेशात जाणार असल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. ते म्हणाले की, “आम्ही उत्तर प्रदेशमध्ये स्वत:ची ‘फिल्मसिटी’ उभारणार आहोत. मुंबईमधून ‘फिल्मसिटी’ नेण्याचा आमचा कोणताही डाव किंवा विचार नाही,” असे स्पष्ट मत मुख्यमंत्री योगी यांनी मांडले.
5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी राज्यांमध्ये स्पर्धा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासमोर ठेवलेल्या पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी देशातील अग्रगण्य राज्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. औद्योगिकदृष्ट्या प्रगतिशील असलेल्या महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेशासह इतर कंपन्यांनी गुंतवणूकदारांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी प्रयत्न केले असून त्याचाच प्रत्यय यानिमित्त दिसून आला.
उद्योजकांचा सरकारवर विश्वास असायला हवा!
उपस्थितांना संबोधित करताना योगी आदित्यनाथांनी राज्यातील गुंतवणुकीवरून महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे निशाण्यावर घेतले. योगी म्हणाले की, “राज्याच्या औद्योगिक प्रगतीसाठी उद्योजकांचा शासन आणि प्रशासनावर विश्वास असणे गरजेचे आहे. आपल्या उद्योगात कुणी आडकाठी आणणार नाही किंबहुना आपली फाईल कुठल्याही कारणाने कुणी अडवणार नाही, याबद्दल उद्योजकांच्या मनात शाश्वती असणे गरजेचे आहे,” असे म्हणत योगींनी तत्कालीन सरकारच्या कार्यकाळात राज्याबाहेर गेलेल्या उद्योगांना महाविकास आघाडीला जबाबदार असल्याचे अधोरेखित केले.
 
Powered By Sangraha 9.0