शिवछत्रपतींचे गुरू रामदास स्वामी, तमिळनाडूतील ग्रंथालयात आढळला संदर्भ
06-Jan-2023
Total Views |
शिवाजी महाराजांचे गुरू रामदास स्वामी, तमिळनाडूतील ग्रंथालयात आढळला संदर्भ
चेन्नई : छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू समर्थ रामदास होते यावर भाष्य करणारा एक पुरावा तमिळनाडूतील ग्रंथालयात आढळला आहे. इथल्या तंजावरच्या सरस्वती महाल या आशिया खंडातील प्राचीन ग्रंथालयातून ही बाब उघडकीस आली आहे. येथील जागेला सरफोजी राजे स्मारक संग्रहालय म्हणूनही ओळखले जाते. संग्रहालयाच्या वृद्धीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज यांचे बंधू व्यंकोजी राजे भोसले राज्यकर्ते होते.
समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना वेदांत उपदेश केल्यासंदर्भातील एक हस्तलिखितही आढळते. याच ग्रंथसंग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास दोघांचे चित्रही उपलब्ध आहे. त्याखाली तमिळ भाषेत मजकूरही लिहीलेला आहे. "छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु श्री समर्थ रामदास स्वामी..." छत्रपती शिवाजी महाराजांच्या बंधुंच्या वंशजांनी जपून ठेवलेले श्री समर्थ रामदासांचे सतराव्या शतकातले एक चित्र आणखी एक छायाचित्रही तिथे आढळते.
१६व्या शतकापूर्वीच्या नायक राजांनी हे ग्रंथालयात स्थापन केले होते. त्यानंतर व्यंकोजी राजेंचे वंशज सरफोजी भोसले (दुसरे) यांनी ती १७व्या शतकात त्याची व्याप्ती वाढवली. भूर्जपत्रे, हस्तलिखिते अशा तब्बल ६० हजार प्राचीन, जुन्या ग्रंथांचा इथे सामावेश आढळतो. ग्रंथालयाच्या बाहेरील बाजून महत्वाच्या पुस्तकांची मांडणी दिसते. सरफोजी(दुसरे) हे स्वतः मोठे अभ्यासक, ज्ञानी आणि कलाकार होते. अनेक विज्ञानशाखा तसेच भारतीय भाषांबरोबरच त्यांना जर्मन, फ्रेंच, इटालियन अशा अनेक भाषा त्यांना अवगत होत्या.
ग्रंथालय संपन्न करण्यासाठी त्यांनी उत्तरेकडील संस्कृत अध्ययन केंद्रांकडून पुस्तके मिळवणे, विकत घेणे, लिहिणे, प्रति करणे ह्यासाठी अनेक पंडितांकडे त्यांनी हे काम दिले होते. साधारण ४० हजारांहून अधिक हस्तलिखिते ही तामिळ आणि संस्कृतमधील आहेत. शिवाय तीन हजारांहून अधिक मराठीतील ग्रंथही आहेत. मराठीतील १२०० ग्रंथ मोडी लिपीतील आहेत. तेलगू, पर्शियन, उर्दू असेही ग्रंथ आहेत. मराठीत संत साहित्य आहे तसेच मराठा राज्याचे बरेचसे संदर्भही इथे आढळतात. जगाचा प्राचीन नकाशा आणि अखंड भारतही इथे उपलब्ध आहे. हे ग्रंथालय सर्वसामान्य जनतेसाठीही खुले आहे. त्यातील संग्रहाचा संदर्भ कोश म्हणूनही वापर केला जातो.