तिघांत चौथा भिडू

    05-Jan-2023   
Total Views |

Uddhav Thackeray


मुंबई महानगरपालिकेसाठी अखेरीस वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या युतीची घोषणा वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी परवा केली. उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर खुद्द आंबेडकरांनीच पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. पण, यावेळी त्यांच्यासोबत ठाकरे गटाकडून मात्र कुणीही सहभागी नसल्याचे प्रकर्षाने दिसून आले. आंबेडकरांची वंचित आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या गेल्या काही दिवसांपासून युतीच्या चर्चाही म्हणा रंगल्या होत्या. अखेरीस या शिवशक्ती-भीमशक्तीच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीकरिता का होईना युतीची घोषणा करण्यात आली. त्यामुळे मुंबई पालिकेवर गेल्या दोन दशकांहून अधिक काळ सत्ता गाजवणार्‍या ठाकरेंच्या शिवसेनेला आता काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह वंचितचाही टेकू घेण्याची परिस्थिती ओढवली आहे.  एकीकडे आंबेडकरांनी पत्रकार परिषदेत युतीचे संकेतही दिले आणि दुसरीकडे मविआ-वंचित युतीला काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसचा छुपा विरोध असल्याचे सांगत याबाबतचा संभ्रम आणखीनच वाढवला. म्हणजे, घोषणा झाली खरी, पण मविआतील तीनपैकी दोन पक्षांचा त्याला विरोधच असेल, तर मग या युतीचे भवितव्य काय, हा प्रश्न उपस्थित होतो. शिवाय काँग्रेस-राष्ट्रवादीचा वंचितच्या रुपाने चौथा भिडू आघाडीत सामील करण्याला विरोध असताना, ठाकरेंनाच ही युती हवीहवीशी वाटते, असेच यातून प्रथमदर्शनी दिसून येते. त्यामुळे ठाकरे आणि आंबेडकरांनी हातमिळवणी केली असली तरी प्रत्यक्षात जागावाटपाच्या चर्चांवेळी वंचितला शिवसेनेच्या कोट्यातून जागा सोडल्या जातील की काँग्रेस-राष्ट्रवादीही काही जागांवर तडझोड करेल, असाच प्रश्न उपस्थित होतो. त्याचबरोबर वंचित-मविआ युती झालीच, तर ती केवळ मुंबई पालिका निवडणुकीपुरती मर्यादित असेल की इतर महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, पुढे विधानसभा, लोकसभेसाठीही ही चांडाळ चौकडी मतदारांना सामोरी जाणार, हे तर येणारा काळच ठरवेल. त्यातच आंबेडकरांनी “आम्ही ८३ जागा मागितल्या होत्या. पण, शिवसेना जेवढ्या जागा देईल, तेवढ्या लढवू,” म्हणत सध्या काहीशी नरमाईची भूमिका घेतली खरी; पण प्रकाश आंबेडकर त्यांच्या शब्दाला जागतात की, वंचित-‘एमआयएम’प्रमाणे ही युतीही अल्पायुषी ठरते, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ठाकरेंची ही अपरिहार्यताच!

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला घरघर लागली. आमदार, खासदार, आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते अशा ऐतिहासिक गळतीने शिवसेनेची सेना नाममात्रच उरली. पक्षचिन्हही हातचे गेले आणि धनुष्यबाणाची जागाही मशालीने घेतली. त्यामुळे मुंबई पालिकेच्या निवडणुकीकरिता गमावलेले बळ पुन्हा कमावण्यासाठी ठाकरेंनी पक्षप्रवेशांचा धडाकाच लावला. एवढेच नाही, तर शिंदेंच्या बंडानंतर चार दिवस का होईना, ठाकरेंची पावले शिवसेना भवनकडे वळली. पक्षसंघटना नव्याने उभारण्याचे शिवधनुष्य म्हणे ठाकरे पितापुत्राने हाती घेतले. पण, पक्षसंघटनेच्या नावाखाली सुषमा अंधारेंसारख्या हिंदुत्वद्वेष्ट्यांची खोगीरभरतीच ठाकरेंनी सुरू केली. प्रकाश आंबेडकरही त्याच पठडीतले नेते. पण, काँग्रेस-राष्ट्रवादीशी सलगी केल्यानंतर शिवसेनेने हिंदुत्वालाच मुळी तिलांजली दिल्याने, आता अशा हिंदुत्वविरोधकांची गर्दी ठाकरेंच्या गोटात जमली तर नवल ते काय... त्यामुळे मुंबई पालिकेच्या निवडणुकांमध्ये विरोधकांना टोमणे मारण्यापलीकडे ठाकरेंच्या हाती काहीच नाही, हेच खरे. त्यातच मुंबईचा विचार करता, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची ताकदही आता नगण्य. मुंबई काँग्रेसमध्ये तर अजूनही पालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्यासाठी एक वर्ग आग्रही आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा मुंबईत चेहरा कोण, इथूनच सगळी सुरुवात. त्यातच एवढी वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीने पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर गैरव्यवहार, भ्रष्टाचाराचे सातत्याने आरोप केले. पण, आता त्याच शिवसेनेशी पालिका पातळीवर जुळवून घ्यायला नेते, कार्यकर्ते फारसे उत्सुक नाहीच. आता या महाविकास आघाडी नावाच्या प्रयोगात वंचितची भर पडल्यास ठाकरेंचे पारडे जड होईल, असेही नाही. कारण, २०१९च्या विधानसभा निवडणुकीत वंचितला मुंबईत चेंबूर विधानसभा क्षेत्र सोडल्यास एकाही ठिकाणी दहा टक्क्यांपेक्षा अधिक मतेही मिळाली नाहीत. त्यामुळे वंचितची ताकद मुंबईत तशी नगण्यच म्हणावी लागेल. काँग्रेस-राष्ट्रवादीही मुंबईत नावापुरतीच आणि राहिला प्रश्न ठाकरेंच्या शिवसेनेचा, तर शिंदेसेनेमुळे तिथेही मोठे भगदाडच पडलेले! त्यामुळे भाजप, शिंदे गट आणि मनसेविरोधात या चारही पक्षांचा मुंबई पालिका निवडणुकीत टिकाव लागणे तसे अवघडच. त्यामुळे विश्वासार्हतेलाच खीळ बसलेल्या ठाकरेंच्या राजकीय अपरिहार्यतेचे फलित भविष्यात स्पष्ट होईलच. 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची